
तेजवानीचे परदेशात पलायन?
पुणे, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्क आणि बोपोडी येथील जमीन व्यवहार प्रकरणांतील कुलमुख्त्यारधारक शीतल किसनचंद तेजवानी हिने परदेशात पलायन केल्याची चर्चा आहे. मात्र, तेजवानी पसार झाल्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही. या दोन्ही प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार प्रकरणात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पार्थ पवार यांच्या ‘अमोडिया’ कंपनीचा बोपोडीतील आणखी एक जमीन व्यवहार उघडकीस आला. बोपोडी आणि कोरेगाव पार्क या दोन्ही प्रकरणांत तेजवानी हिच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस तिचा शोध घेत आहेत. तिने परदेशात पलायन केल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही.
‘हे प्रकरण फसवणुकीचे आहे. फसवणूक, अपहार प्रकरणात आरोपी अटकपूर्व जामीन मिळवू शकतात. या प्रकरणांतील तेजवानी ही परदेशात पसार झाल्याची चर्चा आहे. मात्र, अशा प्रकारची कोणतीही माहिती मिळालेली नाही’, असे आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ‘या जमीन गैरव्यवहार प्रकरणांचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणांतील कागदपत्रे शासकीय विभागाकडून मागविण्यात आली आहे. या कागदपत्रांची पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे .
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु