
अमरावती, 10 डिसेंबर (हिं.स.)।अमरावती शहरातील स्वच्छता व्यवस्थेला गती देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपक्रमांच्या अनुषंगाने आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज सकाळी नवसारी परिसर, वाघमारे चौक तसेच ट्रान्सपोर्ट नगर या भागातील कचरा संकलन आणि विल्हेवाट यंत्रणेची सविस्तर पाहणी केली. शहरातील वाढत्या कचरा निर्मितीकडे लक्ष देत या पथदर्शी पाहणीद्वारे आयुक्तांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान कोणार्क कंपनीच्या यंत्रणेद्वारे संबंधित भागातील कचऱ्याची उचल व त्याची योग्य ती विल्हेवाट लावली जात असल्याचे निरीक्षण आयुक्तांनी केले. कचरा संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीची कार्यक्षमता, परिसरातील स्वच्छता, कचरा वर्गीकरणाच्या पद्धती तसेच नागरिकांना उपलब्ध असलेल्या सुविधा यांचा त्यांनी प्रत्यक्ष अभ्यास केला. स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम आणि नियोजनबद्ध करण्यासाठी कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत, याचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी आयुक्तांनी स्वच्छता विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करून परिसरातील निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे नियमित, वैज्ञानिक पद्धतीने आणि वेळेवर विल्हेवाट लावण्यासाठी विशेष नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. कचरा संकलनात होणारा विलंब टाळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री व व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यावर त्यांनी भर दिला. आयुक्तांनी सांगितले की, शहरातील लोकसंख्येत वाढ, परिसरातील व्यापारी घनता आणि दैनंदिन कचरा निर्मितीमुळे स्वच्छता यंत्रणा अद्ययावत आणि चोख ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांची स्वच्छतेविषयी जागरूकता आणि सहकार्य यामुळेच शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे शक्य होईल. महानगरपालिकेकडून स्वच्छता व्यवस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून, यापुढेही अशा पथदर्शी पाहण्या घेत राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच झोन मधील दैनंदिन साफ सफाई कंत्राटदाराचे कामे समाधानकारक नसल्यामुळे त्यांना ३४ ते ३५ वेळा कारणे दाखवा नोटीसेस देण्यात आलेले आहे. तसेच त्यांना कामामध्ये आवश्यक सुधारणा करण्यासंदर्भात सुनावणी सुध्दा घेण्यात आलेले आहे. त्यामुळे दैनंदिन साफ सफाई कंत्राटदाराने त्यांच्या कामामध्ये सुधारणा करण्यासंदर्भात मा.आयुक्तांनी निर्देश दिलेले आहे. शहराला ‘स्वच्छ अमरावती’ बनविण्याच्या उद्दिष्टाने प्रशासन सातत्याने प्रयत्नशील राहील, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. या पाहणीदरम्यान स्वच्छता विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक राजु ढिक्याव, राजेश राठोड, स्वास्थ निरीक्षक, कोणार्क कंपनीचे कंत्राटदार, मनपा कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी