
चंद्रपूर, 10 डिसेंबर (हिं.स.)।
कापूस खरेदीसाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) कडून लागू करण्यात आलेल्या ऑनलाईन स्लॉट बुकिंग प्रणालीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांबाबत राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे यांनी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांची त्यांच्या विधिमंडळ दालनात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
आमदार देवराव भोंगळे यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले की, सध्याची स्लॉट बुकिंग प्रणाली अत्यंत अव्यवहार्य असून, विशेषतः दुर्गम भागातील आणि कमी तंत्रज्ञान अवगत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही प्रणाली मोठी डोकेदुखी ठरत आहे.
ग्रामीण भागात सातत्याने नेटवर्कची भेडसावणारी समस्या, शेतकर्यांना मोबाईल हाताळता न येणे, तंत्रज्ञानाचा अभाव तसेच अशिक्षितपणामुळे अनेक शेतकरी ऑनलाईन बुकिंग करू शकत नाहीत. याव्यतिरिक्त, प्रत्येक जिनिंगला केवळ १०० स्लॉट्स उपलब्ध असल्याने स्लॉट लवकर संपतात आणि शेतकऱ्यांना त्यांच्या घरापासून दूर असलेल्या जिनिंग मिळतात त्यामुळे कापूस वाहतुकीसाठी वेळेवर गाड्या उपलब्ध होत नसल्याने वाहतुकीकरीता वाढीव खर्चाचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागते. तसेच कापूस वेळेवर विकला न गेल्यामुळे कापुस खराब होऊन मोठे आर्थिक नुकसानासही शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे, परिणामी शेतकऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
आमदार देवराव भोंगळे यांनी शेतकऱ्यांच्या या ज्वलंत समस्या प्रभावीपणे मांडल्यानंतर या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. पणन मंत्र्यांनी यावर लवकरच योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. एवढेच नव्हे, तर त्यांनी तातडीने सीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक (MD) गुप्ता यांना भ्रमणध्वनी करून पुढील आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करण्याचे निर्देश दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव