
अमरावती, 10 डिसेंबर (हिं.स.)। अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समृध्दी महामार्गावर गस्त घालत असताना एक संशयित कंटेनर पकडला. या कंटेनरमध्ये तब्बल ३३ गुरांना हातपाय बांधून कोंबलेले होते. सदर गोवंश तस्करीसाठी जात असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी या सर्व गोवंशाची सुखरूप सुटका करून कंटेनर जप्त केला आहे. समृध्दी महामार्गावरून मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पीआय किरण वानखडे यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पीआय किरण वानखडे यांनी पीएसआय विशाल रोकडे व त्यांच्या पथकाला समृद्धी महामार्गावर गोवंश तस्करी रोखण्याच्या उद्देशाने गस्त घालण्याचे आदेशित केले होते. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व मंगरूळ पोलीस संयुक्तपणे सोमवारी सायंकाळी गस्त घालत होते. त्यावेळी समृद्धी महामार्गावरील आष्टा फाट्याजवळ पुलगावकडून धामणगाव रेल्वेच्या दिशेने जाणारा एक कंटेनर रस्त्याच्या कडेला उभा दिसला. पोलिसांनी कंटेनर जवळ जाऊन पाहणी केली असता त्यामध्ये चालक किंवा वाहक कोणीही नव्हते. त्यानंतर पोलिसांनी कंटेनर उघडून पाहिले असता त्यामध्ये अनेक गोवंश हातपाय बांधून कोंबलेल्या स्थितीत मिळून आले.
त्यावेळी सदर गोवंशाची तस्करीसाठी वाहतूक होत असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी या संपूर्ण गोवंशाची मोजदाद केली असतात त्यामध्ये ३३ गोवंश मिळून आले. पोलिसांनी या सर्व गोवंशाची सुटका केली तसेच १५ लाख रुपयांचा कंटेनर जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्यात अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस पथकाने केलेल्या कारवाईमुळे कंटनेरमधून जाणाऱ्या ३३ गुरांची सुटका करण्यात आली आहे. या गुरांना बांधून याठिकाणावरून कंटनेरमधून घेऊन जात होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी