
नागपूर, 10 डिसेंबर (हिं.स.) - नागपूर व अमरावती विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सर्व प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश आज नागपूर विधानभवन येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,यांच्या अध्यक्षतेखाली पारपडलेल्या बैठकीस आ.अशिष देशमुख, सचिव (रस्ते) श्री. संजय दशपुते, सचिव (बांधकाम) श्री. आबासाहेब नागरगोजे, मुख्य अभियंता (नागपूर) श्री. संभाजी माने, मुख्य अभियंता (अमरावती) श्री. अरुण गाडेगोणे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत नागपूर येथील आमदार निवासस्थान, रवि भवन येथील इमारती, तसेच विविध प्रशासकीय इमारतींची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला.
अमरावती शहरातील राजकमल चौक येथील रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम जलदगतीने पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचेही निर्देश मंत्री भोसले यांनी दिले. नागपूर आणि अमरावती विभागातील सुरू असलेल्या रस्ते प्रकल्पांचा आढावाही यावेळी घेण्यात आला.
प्रलंबित रस्ते प्रकल्पांच्या संदर्भात संबंधित ठेकेदारांना नियोजित वेळेत व दर्जेदार काम पूर्ण करण्याचे कडक निर्देश देण्यात आले. कामाच्या गुणवत्तेबाबत (क्वालिटी कंट्रोल) कोणतीही तडजोड न करता, गुणवत्ता नियंत्रण विभाग तसेच मुख्य अभियंत्यांनी काटेकोरपणे लक्ष ठेवावे, व कामासंबंधित कोणत्याही तक्रारी येऊ नयेत, असेही मंत्री भोसले यांनी नमूद केले.
तसेच राज्यातील सहा विभागांतून इतर राज्यांना जोडणाऱ्या, अंदाजे ३०० ते ६०० किमी लांबीच्या मार्गांचा समावेश असलेल्या जवळपास १५०० किमी राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावाचे नियोजन व तयार करण्याचे निर्देशही मंत्री भोसले यांनी या वेळी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी