
नवी दिल्ली, 10 डिसेंबर (हिं.स.)। मानवाधिकार व्यक्ती आणि समाज या दोहोंना बळकट करतात, हानी रोखतात आणि समुदायांना योग्य दिशेने पुढे नेतात. देश नेहमीच सार्वत्रिक मानवाधिकार मूल्यांचा ठाम समर्थक राहिला आहे. असे प्रतिपादन राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
मानवाधिकार दिनानिमित्त बुधवारी राज्यसभेचे सभापती यांनी सभागृहात मानवाधिकारांच्या जागतिक वारशाची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, सन १९४८ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने स्वीकारलेल्या सार्वत्रिक मानवाधिकार घोषणेला यंदा ७७ वर्षे पूर्ण झाली आहेत.
हा ऐतिहासिक दस्तऐवज आजही जगभरात मानवी प्रतिष्ठा, स्वातंत्र्य, समता आणि न्यायाचा मूलभूत आधारस्तंभ म्हणून कार्यरत आहे.
यावर्षीची जागतिक थीम “मानवाधिकार : आपल्या दैनंदिन जीवनातील आवश्यक बाबी” अशी असल्याचा उल्लेख करत सभापती म्हणाले की, हा दिवस आपल्याला तीन महत्त्वाच्या गोष्टींची आठवण करून देतो — मानवाधिकार सकारात्मक आहेत, ते अत्यावश्यक आहेत आणि ते सर्वांसाठी गरजेचे आहेत.
ते पुढे म्हणाले की, लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे की मानवाधिकार प्रत्येक नागरिकासाठी, विशेषतः समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांसाठी प्रत्यक्षात उतरले पाहिजेत.
मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने त्यांनी आवाहन केले की, आपण सर्वांनी पुन्हा एकदा संकल्प करूया की मानवाधिकार सर्वांसाठी सकारात्मक, आवश्यक आणि सुलभ बनवून असे राष्ट्र आणि विश्व निर्माण करूया, जिथे प्रत्येक व्यक्ती सन्मान आणि अधिकारांसह जीवन जगू शकेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule