
गडचिरोली, 10 डिसेंबर (हिं.स.)
महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेला आणि गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी माओवादविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले आहे. दिनांक 10/12/2025 रोजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर 11 वरिष्ठ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पित माओवाद्यांमध्ये 02 डिव्हीसीएम (DVCM) दर्जाचे वरिष्ठ माओवादी, 03 पीपीसीएम (PPCM), 02 एसीएम (ACM) आणि 04 सदस्य पदावरील माओवाद्यांचा समावेश आहे.
बक्षिसाची रक्कम आत्मसमर्पण केलेल्या या 11 माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने एकूण 82 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
आत्मसमर्पण: यापैकी 04 माओवाद्यांनी त्यांच्या माओवादी गणवेशात, शस्त्रांसह पोलीस महासंचालक यांच्यासमोर आत्मसमर्पण केले.
सन 2025 मधील यश: गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सन 2025 मध्ये आतापर्यंत एकूण 112 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची माहिती
आत्मसमर्पण केलेल्या 11 माओवाद्यांमध्ये खालील प्रमुख माओवादी नेत्यांचा समावेश आहे:
| क्र. | नाव (मूळ नाव) | पद | दलम/कमिटी |
| 1 | रमेश ऊर्फ भिमा ऊर्फ बाजु गुड्डी लेकामी | डिव्हीसीएम (DVCM) | भामरागड दलम |
| 2 | भिमा ऊर्फ सितु ऊर्फ किरण हिडमा कोवासी | डिव्हीसीएम (DVCM) | पश्चिम बस्तर डिव्हीजन कमिटी सदस्य |
| 3 | पोरीये ऊर्फ लक्की अडमा गोटा | पीपीसीएम/सेक्शन कमांडर | पीएलजीए बटालियन क्र. 01 |
| 4 | रतन ऊर्फ सन्ना मासु ओयाम | पीपीसीएम | कंपनी क्र. 07 |
| 5 | कमला ऊर्फ रागो इरिया वेलादी | पीपीसीएम | कंपनी क्र. 07 |
| 6 | पोरीये ऊर्फ कुमारी भिमा वेलादी | एसीएम (ACM) | कान्हा भोरमदेव दलम |
| 7 | रामजी ऊर्फ मुरा लच्छु पुंगाटी | एसीएम (ACM) | कुतूल एरीया कमिटी |
| 8 | सोनु पोडीयाम ऊर्फ अजय सानू कातो | सदस्य | कंपनी क्र. 01 प्लाटून क्र. 02 |
| 9 | प्रकाश ऊर्फ पांडू कुंड्रा पुंगाटी | सदस्य | प्लाटून क्र. 32 |
| 10 | सिता ऊर्फ जैनी तोंदे पल्लो | सदस्य | प्लाटून क्र. 32 |
| 11 | साईनाथ शंकर मडे | सदस्य | एओबी (आंध्रा-ओरीसा बॉर्डर) दलम |
रमेश उर्फ भिमा ऊर्फ बाजु गुड्डी लेकामी याच्यावर गडचिरोली जिल्ह्यात एकूण 88 गुन्हे दाखल आहेत (43 चकमक, 08 जाळपोळ, 37 इतर).
आत्मसमर्पण योजनेंतर्गत मिळणारे पुनर्वसन लाभ
आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना महाराष्ट्र शासनाच्या धोरणांनुसार पुनर्वसन आणि प्रोत्साहनपर लाभ मिळतील.
डिव्हीसीएम (DVCM) दर्जाच्या माओवाद्यांना: प्रत्येकी ₹ 8.5 लाख (रमेश ऊर्फ भिमा व भिमा ऊर्फ सितु).
* पीपीसीएम/एसीएम दर्जाच्या माओवाद्यांना: प्रत्येकी ₹ 4.5 लाख ते ₹ 5 लाख पर्यंत.
* सदस्य (Members) दर्जाच्या माओवाद्यांना: प्रत्येकी ₹ 4.5 लाख ते ₹ 5 लाख पर्यंत.
* पती-पत्नीसाठी अतिरिक्त मदत: आत्मसमर्पण केलेल्या तीन जोडप्यांना (प्रकाश-सिता, भिमा-पोरीये आणि रतन-कमला) ₹ 1.5 लाख अतिरिक्त बक्षीस मिळेल.
गटाने आत्मसमर्पण केल्यास: एकत्रित मदत म्हणून ₹ 10 लाख बक्षीस.
माओवादी चळवळीला मोठा धक्का
आत्मसमर्पणाच्या या सत्रामुळे गडचिरोली आणि संपूर्ण दंडकारण्य विभागातील माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. या वर्षी 01 जानेवारी 2025 रोजी दंडकारण्य स्पेशन झोनल कमिटीची सदस्य ताराक्का सिडाम हिच्यासह 11 माओवाद्यांनी आणि 15 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्रीय समिती सदस्य मल्लोजुला वेनुगोपाल राव ऊर्फ भुपती ऊर्फ सोनू यांनी आत्मसमर्पण केले होते. या वरिष्ठ आत्मसमर्पणामुळे गडचिरोली जिल्ह्रातील माओवादी चळवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आली आहे.
उत्कृष्ट कामगिरीसाठी सत्कार व 'प्रोजेक्ट उडान' मार्गदर्शिकेचे अनावरण
पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांच्या हस्ते विशेष अभियान पथक (C-60) मधील अधिकारी व जवानांचा त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी माओवादविरोधी कारवाईतील C-60 च्या कामाचे कौतुक केले.
या कार्यक्रमात, दुर्गम भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट उडान- वेध विकासाचा शासकीय योजना मार्गदर्शिका’ या पुस्तकाचे अनावरण पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले.
पोलीस महासंचालक यांचे आवाहन:
श्रीमती रश्मि शुक्ला यांनी उर्वरित माओवाद्यांना हिंसेचा त्याग करून शस्त्रे खाली ठेवून सन्मानाचे जीवन जगण्यासाठी लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आणि शांततेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond