
नवी दिल्ली, ११ डिसेंबर (हिं.स.)माजी विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने उझबेकिस्तानच्या झावोखिर सिंदारोव्हचा पराभव करून फ्रीस्टाइल बुद्धिबळ ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता त्याचा सामना अमेरिकेच्या लेव्हॉन अॅरोनियनशी होणार आहे..
सिंदारोव्हने कार्लसनला जोरदार टक्कर दिली. त्याने दुसरा रॅपिड गेम जिंकून सामना ब्लिट्झ टायब्रेकरमध्ये नेला होता. ब्लिट्झ सामन्यांमध्ये वेळेच्या तीव्र दबावाखाली, कार्लसनने पहिला ५+२ गेम जिंकला आणि दुसरा ड्रॉ करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले.
ब्लिट्झ सामन्यांबद्दल, कार्लसन म्हणाला, दोन्ही बुद्धिबळपटूंसाठी हा पूर्णपणे गोंधळ होता. मी काय म्हणू शकतो, तो फक्त एक सामना होता. मी त्याच्यापेक्षा थोडा जास्त वेळ थांबलो आणि अंतिम फेरीत पोहोचणे चांगले वाटते.
दुसऱ्या उपांत्य फेरीत, लेव्हॉन अॅरोनियनने जर्मनीच्या जीएम व्हिन्सेंट कीमरचा ब्लिट्झ टायब्रेकरमध्ये २-० असा पराभव केला. यापूर्वी दोन्ही रॅपिड गेम अनिर्णित राहिले होते. अॅरोनियन आणि कार्लसन आता अव्वल स्थानासाठी भिडतील, विजेत्याला २००,००० डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळेल.
खालच्या गटाच्या उपांत्य फेरीत, भारताच्या अर्जुन एरिगाईसीने अमेरिकेच्या जीएम हान्स निमनचा पराभव केला. आता पाचव्या स्थानासाठी एरिगाईसीची लढत अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाशी होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे