
पालघर, 13 डिसेंबर (हिं.स.)।
अनुसूचित जमातींसह समाजातील वंचित घटकांचे सामाजिक-आर्थिक सक्षमीकरण आणि शासनाच्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आदि कर्मयोगी अभियान’ अंतर्गत आदि कर्मयोगी फेलोशिपच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थी ग्रामीण विकासात महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले
पालघर जिल्हा प्रशासन आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालय यांच्या मध्ये ‘आदि कर्मयोगी फेलोशिप’ राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
या बैठकीत पालघर येथील दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. किरण सावे उपस्थित होते. Whole-of-Government Approach दृष्टिकोनावर आधारित या उपक्रमाद्वारे गावपातळीवरील कर्मचाऱ्यांची क्षमता-वृद्धी, योजनांची देखरेख आणि समुदाय सहभाग वाढवण्याला नवी दिशा मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची संधी मिळणार असून ग्रामीण विकास व अर्थशास्त्रासह सामाजिक विज्ञानाचे उत्साही विद्यार्थी या फेलोशिपचा भाग होणार असून, गावांतील आजीविका वृद्धी, आर्थिक स्वावलंबन, योजना अंमलबजावणीची गुणवत्ता आणि समुदाय सहभाग वाढविण्याच्या प्रक्रियेत ते थेट योगदान देतील. प्रकल्प कार्यालय जव्हार व डहाणू , महिला व बालविकास, कृषी, आरोग्य, वन विभाग आणि इतर शासकीय यंत्रणांचेही सहकार्य या कार्यक्रमास राहणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले. ग्रामीण प्रशासकीय व्यवस्था मजबूत करणे व समुदाय सहभाग बळकट कारणे
गावातील विकास योजनांचे माहितीआधारित नियोजन व देखरेख सक्षम करणे ग्रामीण आणि आदिवासी समाजात आर्थिक सक्षमीकरण व आजीविका वृद्धीला चालना देणे ही फेलोशिपची उद्दिष्टे असणार आहेत.
‘आदि कर्मयोगी फेलोशिप’मुळे कार्यरत तरुणांना प्रशासनाच्या यंत्रणेशी जोडण्याची आणि प्रत्यक्ष विकास प्रक्रियेचा अनुभव घेण्याची अनोखी संधी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा हा उपक्रम आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यासाठी नवी ऊर्जा ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL