लोककलावंत डॉ.गणेश चंदनशिवे यांना डॉ.शंकर बोऱ्हाडे लोककला पुरस्कार जाहीर
नाशिक, 13 डिसेंबर (हिं.स.)। लोककला आणि लोकसंस्कृतीचा वारसा जपत लोकसंस्कृतीचे दर्शन घडवून ही परंपरा जोपासण्याची जबाबदारी आपली आहे. लोककला मनोरंजनासाठी नाही तर समाजजागृतीचे एक साधन आहे. यासाठी भरीव योगदान देणारे मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प
लोककलावंत डॉ.गणेश चंदनशिवे यांना डॉ.शंकर बोऱ्हाडे लोककला पुरस्कार जाहीर


नाशिक, 13 डिसेंबर (हिं.स.)। लोककला आणि लोकसंस्कृतीचा वारसा जपत लोकसंस्कृतीचे दर्शन घडवून ही परंपरा जोपासण्याची जबाबदारी आपली आहे. लोककला मनोरंजनासाठी नाही तर समाजजागृतीचे एक साधन आहे. यासाठी भरीव योगदान देणारे मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख डॉ.गणेश चंदनशिवे यांना यंदाचा 'साहित्यिक डॉ.शंकर बोऱ्हाडे लोककला पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. ११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्राचार्य डॉ. प्रशांत पाटील, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, शिवव्याख्याते डॉ.आबा पाटील, श्रीकांत बेणी, वसंतराव खैरनार, ॲड.अभिजीत बगदे, मुक्त विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ.दत्ता गुजराथी, संजय करंजकर, कवी अरुण घोडेराव, आर्किटेक विजय पवार यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने १७ जानेवारी, २०२६ रोजी आयोजित अ.भा.शेकोटी लोककला साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी हा लोककला पुरस्कार महाराष्ट्राची लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर, तमाशासम्राट रघुवीर खेडकर यांना देण्यात आला आहे.

खडतर परिस्थितीवर मात करून देश-विदेशात प्रवास करून लोककला पोहोचविण्याचे काम करून, लोककलावंतांचा आवाज सातासमुद्रापार पोहोचविण्याचे काम डॉ.चंदनशिवे यांनी केले आहे. लोककलेशी त्यांची नाळ जुळली असून लावणी, पोवाडा, भारुड, तमाशा, गोंधळ, कृष्णावतार अशा दुर्लक्षित राहिलेल्या लोककलांसाठी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत खास अभ्यासक्रम सुरु करून अनेक विद्यार्थी आता लोककलेतून अभिनयाचे धडे गिरवू लागले आहेत. तर अनेक विद्यार्थी लोकनाट्यातुन आपले उपजीविकीचे साधन बनवत आहेत. डॉ.गणेश चंदनशिवे गेल्या दीड दशकापासून लोककलेची परंपरा जोपासत आहे. याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती निवड समितीने दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande