
बेकायदा भंगार गोदामांवर तात्काळ कारवाईची मागणी
पालघर, 13 डिसेंबर (हिं.स.)।
पालघर शहरातील खारेकृरण मार्गावर एका शाळेच्या लगत बेकायदा उभारण्यात आलेल्या भंगार गोदामाला परवा रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक तसेच ज्वलनशील केमिकल व रासायनिक कचरा साठवण्यात आल्याने काही क्षणातच आगीने रोद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच पालघर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले.
सदर भंगार गोदामाच्या शेजारी अभिनव शिक्षण संस्थेची इंग्लिश माध्यमाची शाळा असून, आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने शाळा बंद होती, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
खारेकृरण मार्गावर चार ते पाच बेकायदा भंगार दुकाने व गोदामे वस्तीतच सुरू असून, काही ठिकाणी रिकामे गॅस सिलिंडर रस्त्याकडेला ठेवलेले आढळून येतात. विशेष म्हणजे या मार्गावरून दररोज आठ ते दहा हजार विद्यार्थी ये-जा करत असतात. अशा संवेदनशील परिसरात भंगार गोदामांना परवानगी कशी दिली जाते, असा प्रश्न आता या घटनेन्तर नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
पूनम पार्क परिसरालगत घडलेल्या या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे बेकायदा भंगार गोदामांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. शाळा, वस्ती आणि वर्दळीच्या मार्गांलगत सुरू असलेले असे धोकादायक व्यवसाय अपघाताला आमंत्रण देणारे ठरत असून, याकडे प्रशासन गांभीर्याने पाहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL