
नवी दिल्ली , 14 डिसेंबर (हिं.स.)।भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजकीय आरोप–प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने केलेल्या आरोपांना भारताने कठोर प्रत्युत्तर दिले आहे. भारताने स्पष्टपणे सांगितले आहे की, त्याने कधीही आपल्या भूमीचा वापर बांगलादेशविरोधी कारवायांसाठी होऊ दिलेला नाही आणि बांगलादेशमध्ये नेहमीच स्वतंत्र, निष्पक्ष व शांततापूर्ण निवडणुकांचे समर्थन केले आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशच्या अंतरिम सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनावर प्रतिक्रिया देताना म्हटले की,भारतावर लावलेले आरोप पूर्णपणे फेटाळण्यात येत आहेत. या मुद्द्यावर भारताची भूमिका पूर्वीप्रमाणेच असून त्यात कोणताही बदल झालेला नाही, असे मंत्रालयाने पुन्हा स्पष्ट केले. मंत्रालयाने सांगितले की भारत सातत्याने हेच म्हणत आला आहे की बांगलादेशमध्ये शांत वातावरणात, सर्वांना सहभागी करून घेणाऱ्या आणि विश्वासार्ह निवडणुका होणे आवश्यक आहे.
भारताचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा बांगलादेशने भारतात नियुक्त केलेले आपले उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावले होते. बांगलादेशने भारतात वास्तव्यास असलेल्या शेख हसीना यांच्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ढाकाचा आरोप आहे की शेख हसीना भारतातून अशी विधाने करत आहेत, ज्यामुळे बांगलादेशमधील नेते आणि कार्यकर्ते हिंसक व दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त होऊ शकतात.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा स्पष्ट केले की बांगलादेशला अस्थिर करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांमध्ये भारताचा सहभाग नाही. तसेच, भारताने कधीही आपल्या भूमीवरून बांगलादेशच्या जनतेच्या हितांच्या विरोधात कोणत्याही प्रकारच्या कारवायांना परवानगी दिलेली नाही, असे मंत्रालयाने ठामपणे सांगितले.
यासोबतच, भारताने असेही नमूद केले की निवडणुकांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी बांगलादेशच्या अंतरिम सरकारची आहे. मंत्रालयाने अपेक्षा व्यक्त केली आहे की बांगलादेश सरकार शांततापूर्ण आणि सुरक्षित निवडणुका पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode