बीड - कामगाराचा मुलगा बनला पॅरा कमांडो
बीड, 14 डिसेंबर (हिं.स.)अंबाजोगाई तालुक्यातील भावठाणागावातील मंगेश बालासाहेब जाधव यांची भारतीय सैन्यदलातील पॅरा कमांडो म्हणून निवड झाली आहे . ऊसतोड कामगाराच्या घरात जन्मलेल्या व चार पत्र्यांचे घर असलेल्या दहाजणांच्या कुटुंबात ते वाढले. वडील ऊस
बीड - कामगाराचा मुलगा बनला पॅरा कमांडो


बीड, 14 डिसेंबर (हिं.स.)अंबाजोगाई तालुक्यातील भावठाणागावातील मंगेश बालासाहेब जाधव यांची भारतीय सैन्यदलातील पॅरा कमांडो म्हणून निवड झाली आहे . ऊसतोड कामगाराच्या घरात जन्मलेल्या व चार पत्र्यांचे घर असलेल्या दहाजणांच्या कुटुंबात ते वाढले. वडील ऊसतोडणी करत उपाशी दिवस काढायचे. तरीही मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी कष्ट सोसले. मंगेश लहानपणापासूनच सैन्यात जाण्याचे स्वप्न पाहत होते. सहावीत असतानाच हे ध्येय ठरवले. दहावीत ९२ टक्के गुण मिळवले. तरीही लवकर सैन्यात भरती व्हावे म्हणून अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात ११ वी कॉमर्सला प्रवेश घेतला. एनसीसी जॉईन केली. कॅम्पमध्ये पॅरा कमांडोजवानाला भेटले. त्याच्यासारखे बनायचे ठरवले. रोज १० किलोमीटर धावणे, डोंगर चढणे, हे सगळे त्यांनी अंगवळणी पाडले.

सैन्याची परीक्षा दिल्यावर ते ऊसतोडणीसाठी कारखान्यावर गेले. तिथेच थंडीत ऊस तोडत असताना मित्राचा फोन आला. निकाल लागला होता. मंगेशची निवड झाली होती. त्यांनी आई-वडिलांना ही बातमी दिली. तिघांनी ऊसाच्या फडातच एकमेकांना मिठी मारली. आनंदाने रडले. या यशामागे मेजर एस.पी. कुलकर्णी, लेफ्टनंट पी.डी. शिंपले, लेफ्टनंट राजकुमार थोरात यांचे मार्गदर्शन आणि योगेश्वरी ग्राऊंडवरील सराव कारणीभूत ठरले. मंगेश यांनी २०० पैकी १९० गुण मिळवले. कोणतीही शिकवणी न लावता, फक्त यूट्यूबवरून अभ्यास केला. आता ते पॅरा कमांडो म्हणून भारतीय सैन्यात रुजू झाले आहेत. हा प्रवास केवळ मंगेश यांचा नाही. तर प्रत्येक कष्टकरी तरुणाला प्रेरणा देणारा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande