मुलुंड येथील पक्षी उद्यान मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्वणी ठरो - मुख्यमंत्री
मुंबई, 15 डिसेंबर (हिं.स.) - मुलुंडमध्ये होऊ घातलेले प्रकल्प हे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावतानाच मुलुंडचा कायापालट करणारे आहेत. त्यापैकी एक नवा मापदंड हा आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘विदेशी पक्षी उद्यानाचे माध्यमातून स्थापन होणार आहे.
 
भूमीपूजन सोहळा
 
* मुलुंडमध्ये पर्यटनाला चालना मिळणार - पालकमंत्री आशीष शेलार
* अत्याधुनिक, आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘विदेशी पक्षी उद्यानाचे भूमिपूजन संपन्न
 
 
मुंबई, 15 डिसेंबर (हिं.स.) - मुलुंडमध्ये होऊ घातलेले प्रकल्प हे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावतानाच मुलुंडचा कायापालट करणारे आहेत. त्यापैकी एक नवा मापदंड हा आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘विदेशी पक्षी उद्यानाचे माध्यमातून स्थापन होणार आहे. सर्व प्रकल्प पर्यावरणपूरक असून निसर्गाच्या हातात हात घालून जाणारे आहेत. या प्रकल्पाच्या निमित्ताने मुंबईचे वैभव कित्येक पटीने वाढण्यासाठी मदत होईल. निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी हा प्रकल्प विकसित होत आहे याचा आनंद आहे. मुलुंड येथील पक्षी उद्यान हे मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्वणी ठरो, अशी सदिच्छा मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 
मुंबईच्या उपनगरीय भागात नागरिक आणि पर्यटकांसाठी, पर्यटनाचा नवा आणि आकर्षक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुलुंड (पश्चिम) परिसरातील नाहूर येथे अत्याधुनिक ‘विदेशी पक्षी उद्यान’ (Exotic Bird Park) उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या पक्षीगृहाचे भूमिपूजन रविवारी (१४ डिसेंबर) सायंकाळी झाले. त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे (ऑनलाइन) संबोधित केले.
राज इंडस्ट्रियल इस्टेटच्या मागे, डी. पी. रोड, सालपादेवी पाडा, मुलुंड (पश्चिम), मुंबई येथे हा सोहळा पार पडला.
बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित मनसादेवी तुलसीराम अगरवाल सर्वसाधारण रुग्णालयाच्या मुलुंड (पश्चिम) मध्ये बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीचे लोकार्पणही करण्यात आले.
माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आशिष शेलार; स्थानिक आमदार श्री. मिहिर कोटेचा, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी (दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती), अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, माजी खासदार श्री. मनोज कोटक, उपआयुक्त (विशेष) तथा (उद्याने) श्रीमती चंदा जाधव, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे संचालक श्री. संजय त्रिपाठी, प्रमुख अभियंता (इमारत परिरक्षण) श्री. मेहूल पेंटर यांच्यासह विविध मान्यवरांची या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे या सोहळ्याला संबोधित केले. ते म्हणाले की, मुलुंडच्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने विकास प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. कचरा क्षेपणभूमीवर गोल्फ पार्क करण्याची संभाव्यता तपासण्यात येणार आहे. नवीन न्यायालय इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित श्रीमती मनसादेवी तुलसीराम अगरवाल सर्वसाधारण रुग्णालय, विदेशी पक्षी उद्यान अशा वैविध्यपूर्ण प्रकल्पांमुळे मुलुंडकरांचे राहणीमान उंचावण्यासाठी मदत होईल, असे श्री. शिंदे यांनी नमूद केले.
माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार म्हणाले की, एका बाजुला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि दुसर्‍या बाजूला आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘विदेशी पक्षी उद्यानाची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पाला मुलुंडचे नाव लागणार आहे, याचा आनंद आहे. जगभरातील विविध प्रांतातील पक्षी, त्यांच्यासाठी विविध प्रकारचे खाद्य, विभिन्न अधिवास अशी रचना याठिकाणी करण्यात येईल. त्यामुळे पर्यटन आणि पर्यटक अशा दोन्ही गोष्टींना चालना मिळेल. जिथून मुंबईची सुरूवात होते, अशा ठिकाणी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे, याचा आनंद आहे. हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प हाती घेतल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन कौतुकास पात्र आहे, असे उद्गार देखील शेलार यांनी काढले.
स्थानिक आमदार मिहिर कोटेचा म्हणाले की, मुलुंडकरांसाठी गोल्फ क्लब तयार करण्याची चाचपणी केली जाईल. सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते, पेट्रोल पंप, अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘विदेशी पक्षी उद्यान, तीन उद्यानाचे भूमिपूजन अशा विविध नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मेट्रोच्या रूपाने भविष्यकरिता मुलुंडकरांसाठी वाहतूक सुविधा निर्माण होत आहे. एकूणच नागरी सुविधा, पर्यटन तसेच मनोरंजन आणि विरंगुळा अशा सर्व सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे, अशी माहिती कोटेचा यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande