अमरावती - शिवणगावमध्ये पुन्हा भूकंपाचे झटके; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
अमरावती, 16 डिसेंबर, (हिं.स.) शिवणगाव परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज सकाळी १२.०७ वाजता हा झटका जाणवला. यापूर्वी २४ व २५ नोव्हेंबर रोजीही याच परिसरात भूकंपाचे झटके जाणवले होते. सलग काही
शिवनगावमध्ये पुन्हा भूकंपाचे झटके; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


अमरावती, 16 डिसेंबर, (हिं.स.) शिवणगाव परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज सकाळी १२.०७ वाजता हा झटका जाणवला. यापूर्वी २४ व २५ नोव्हेंबर रोजीही याच परिसरात भूकंपाचे झटके जाणवले होते. सलग काही दिवसांच्या अंतराने पुन्हा झटके जाणवत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली आहे.

या आधी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिओलॉजिकल (भूवैज्ञानिक) पथकाने शिवणगाव येथे भेट देऊन तपासणी केली होती. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही गावाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला होता. मात्र या तपासणीनंतर भूकंपाच्या कारणाबाबत कोणतीही ठोस माहिती नागरिकांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनातील संभ्रम अद्याप दूर झालेला नाही.

दरम्यान, प्रशासनाने शिवणगाव व शिरजगाव मोझरी येथे भूकंप मापक यंत्र बसविण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही ही यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. सतत भूकंपाचे झटके जाणवत असताना मापक यंत्र न बसविल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. त्यामुळे ही यंत्रणा तातडीने बसवावी, अशी मागणी सरपंच धर्मराज खडसे व सामाजिक कार्यकर्ता प्रशांत कांबळे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात

सातत्याने शिरजगाव, शिवणगाव येथे जमिनीत हादरे बसत आहे. हे भूकंपाचे आहेत की अजून कशाचे हे सांगण्यात प्रशासन असमर्थ ठरले आहे. दरवेळी प्रशासन फक्त पाहणी करून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसत आहे. त्यामुळे यावेळीतरी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात. अन्यथा यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी स्विकारण्याची तयारी ठेवावी. त्याशिवाय, तातडीने भूकंप मापक यंत्र बसवण्यात यावे. अन्यथा तहसील कार्यालयात येत्या ८ दिवसांनंतर ठिय्या आंदोलन करण्यात येईल.- प्रशांत कांबळे (सामाजिक कार्यकर्ता)

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande