
छत्रपती संभाजीनगर, 16 डिसेंबर, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. त्यात २८५६ प्रलंबित प्रकरणे व ७७० दाखलपूर्व असे एकुण ३६२६ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ४४ कोटी ४३ लक्ष ८५ हजार ९८३ रुपयांची तडजोड झाली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती वैशाली फडणीस यांनी दिली आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण , नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण ,मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा व सत्र न्यायालय येथे प्रलंबित व वादपूर्व प्रकरणांचे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गिरीश रा.अग्रवाल अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे शासकीय अधिकारी, विद्युत कंपनीचे अधिकारी, वित्तीय संस्था, वकील व बँकेचे अधिकारी यांच्या समवेत बैठका घेण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय लोकअदालतीच्या तयारीसाठी सर्व न्यायिक अधिकारी,विधीज्ञ, सरकारी वकील, वित्तीय संस्थेचे अधिकारी, मोबाईल प्रकरणाचे संबंधित घटकांना लोकअदालतीमध्ये प्रकरण तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन करण्यात आले होते. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्ह्यात एकुण ३४ पॅनल तयार करण्यात आले होते.
मोटार अपघात, विद्युत चोरी, धनादेश अनादर प्रकरणे, कौटुंबिक, भूसंपादन व तडजोडयुक्त दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच वादपुर्व प्रकरणामध्ये विविध बॅंका व वित्तीय संस्थांची वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती.
त्यात प्रलंबित असलेली एकूण २८५६ तर दाखल पूर्व ७७० अशा एकूण ३६२६ प्रकरणांमध्ये तडजोड झाली. प्रलंबित प्रकरणांध्ये ४० कोटी ९९ लाख ६१ हजार ३६ रुपये तर वादपूर्व प्रकरणांमध्ये ३ कोटी ४४ लाख २४ हजार ९४७ रुपये अशी एकूण ४४ कोटी ४३ लाख ८५ हजार ९८३ रुपये इतक्या रकमेची वसूली झाली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis