बांगलादेश हिंसाचार : उच्चायुक्तालयाकडून भारतीय नागरिकांसाठी सूचना जारी
नवी दिल्ली , 19 डिसेंबर (हिं.स.)।बांगलादेशमध्ये शेख हसीनांचे कट्टर विरोधक नेते शरीफ उस्मान हादी यांच्या निधनानंतर देशात हिंसाचार उसळला आहे. या पार्श्वभूमीवर ढाक्यातील भारतीय उच्चायुक्तालयाने बांगलादेशमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी एक सल्ला (अ‍
बांगलादेश हिंसाचार : उच्चायुक्तालयाकडून भारतीय नागरिकांसाठी सूचना जारी


नवी दिल्ली , 19 डिसेंबर (हिं.स.)।बांगलादेशमध्ये शेख हसीनांचे कट्टर विरोधक नेते शरीफ उस्मान हादी यांच्या निधनानंतर देशात हिंसाचार उसळला आहे. या पार्श्वभूमीवर ढाक्यातील भारतीय उच्चायुक्तालयाने बांगलादेशमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी एक सल्ला (अ‍ॅडव्हायझरी) जारी केली आहे. या सल्ल्यात भारतीय नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि स्थानिक वाहतुकीचा वापर करून प्रवास टाळावा, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

बांगलादेशातील निदर्शकांनी भारतविरोधी घोषणाबाजी करत, हादी यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर भारतात पळून गेल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशमधील परिस्थिती भारतीय नागरिकांसाठी अतिशय संवेदनशील आणि नाजूक बनली आहे. यादरम्यान, ढाक्यातील भारतीय उच्चायुक्तालयाने पुन्हा एकदा भारतीय नागरिकांसाठी अ‍ॅडव्हायझरी जारी करत, स्थानिक प्रवास टाळण्याचा आणि शक्य तितके आपल्या निवासस्थानीच राहण्याचा सल्ला दिला आहे. कोणतीही आकस्मिक गरज भासल्यास, भारतीय नागरिकांनी ढाक्यातील भारतीय उच्चायुक्तालय किंवा संबंधित सहाय्यक उच्चायुक्तालयाशी तात्काळ संपर्क साधावा, असेही या सूचनेत नमूद करण्यात आले आहे.

हादी यांच्या मृत्यूनंतर देशाला उद्देशून केलेल्या दूरदर्शन संदेशात बांगलादेशचे अंतरिम प्रमुख मोहम्मद युनूस यांनी म्हटले, “त्यांचे जाणे देशाच्या राजकीय आणि लोकशाही व्यवस्थेसाठी भरून न निघणारी हानी आहे.” नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करताना युनूस यांनी सांगितले की, सरकार या घटनेची पारदर्शक चौकशी करेल आणि जे कोणी या घटनेला जबाबदार असतील, त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल. त्यांनी संयम बाळगण्याचे आवाहन करत इशारा दिला की हिंसाचारामुळे देशातील विश्वासार्ह निवडणुकांचा मार्ग अधिकच कमकुवत होईल.अंतरिम प्रशासनाने हादी यांच्या सन्मानार्थ शनिवारी एक दिवसाचा राजकीय शोक जाहीर केला आहे. या काळात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवले जातील आणि देशभर विशेष नमाज पठण करण्यात येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande