

रायगड, 2 डिसेंबर, (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील महाडनंतर आता रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीतही तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. मतदानाच्या काही तासांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाल्याने परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर गंभीर आरोप करून राजकीय वातावरण आणखी तापवले आहे.
सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी रोख रक्कम वाटप केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. या प्रकरणाची माहिती मिळताच भाजप उमेदवार आणि कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी दोन्ही गटांमध्ये चिथावणीखोर वाद निर्माण झाला आणि स्थिती काही क्षणातच हाताबाहेर गेली.
वाद चिघळताच, भाजपच्या एका उमेदवाराला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप भाजपने केला आहे. मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच निवडणूक विभागालाही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी तत्काळ दल तैनात करून दोन्ही गटांना दूर करण्यात आले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सर्व आरोप फेटाळून लावताना उलट भाजपच निवडणूक प्रक्रियेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला. दोन्ही पक्षांकडून तक्रारी दाखल होत असून, पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व्हिडिओ आणि प्रत्यक्ष साक्षीदारांचे जबाब नोंदवत आहेत.
निवडणूक प्रक्रियेतील वाढता गोंधळ पाहता प्रशासनाने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवत मतदान सुरळीत पार पडावे, यासाठी कडक कारवाईचे संकेत दिलेत. महाडमध्ये झालेले राडे अद्याप शांत होत नसतानाच रोह्यातील या घटनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील तणाव आणि राजकीय ध्रुवीकरण स्पष्ट होत असल्याचे चित्र दिसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके