
रायगड, 23 डिसेंबर (हिं.स.)। प्रखर हिंदुत्ववादी व राष्ट्रीय हितासाठी कार्य करणाऱ्या संघटनांपैकी एक म्हणजे विश्वहिंदु परिषद आणि बजरंग दल. समाजात हिंदुत्व व राष्ट्रवादी विचार रुजविण्यासाठी धार्मिक, सामाजिक आणि देशहिताचे विविध कार्यक्रम आयोजित करताना, म्हसळा शहरात प्रथमच गीता जयंती साजरी केली जाणार आहे.
यावेळी विश्वहिंदु परिषद आणि रायगड जिल्हा बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत म्हसळा न्यू इग्लिश स्कूल ते धाविर मंदीर येथे भव्य शौर्य पद संचलन आयोजित करण्यात आले आहे. या पद संचलनानंतर धाविर मंदीराजवळ कार्यक्रमाचे रूप भव्य सभेत रूपांतरित होईल. म्हसळा प्रखंड मंत्री प्रसन्न निजामपुरकर यांच्या वतीने सर्व हिंदूंना या राष्ट्रहिताच्या कार्यात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी सभेला मार्गदर्शन करणार दिपक महाराज सखाराम जगताप (खोपोली) हे प्रमुख वक्ते असतील.
त्याचबरोबर विश्वहिंदु परिषद रायगड जिल्हा अध्यक्ष आणि केंद्रीय सल्लागार ह.भ.प. मारुती बुवा कोल्हाटकर, बजरंग दल रायगड जिल्हा संयोजक किरण कानडे (रोहा), तसेच विश्वहिंदु परिषद रायगड जिल्हा मंत्री जितेंद्र करंजकर यांचा देखील कार्यक्रमात सहभाग राहणार आहे.
या कार्यक्रमाद्वारे केवळ धार्मिक व सामाजिक संदेश दिला जाणार नाही, तर युवकांमध्ये राष्ट्रप्रेम आणि हिंदु संस्कृतीचे संवर्धन करण्याचा प्रयत्नही केला जाईल. सर्व हिंदूंना या कार्यक्रमात सहभागी होऊन आपला गौरवशाली वारसा साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके