दिव्यांग नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात - जिल्हाधिकारी मित्तल
जालना , 3 डिसेंबर, (हिं.स.)।दिव्यांग नागरिकांच्या समस्या ओळखून त्या तातडीने आणि प्राधान्याने सोडविण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले. विविध शासकीय योजनांमधून दिव्यांग बांधवांना दिला जाणारा लाभ कोणत्याह
दिव्यांग नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात  - जिल्हाधिकारी मित्तल


जालना , 3 डिसेंबर, (हिं.स.)।दिव्यांग नागरिकांच्या समस्या ओळखून त्या तातडीने आणि प्राधान्याने सोडविण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले. विविध शासकीय योजनांमधून दिव्यांग बांधवांना दिला जाणारा लाभ कोणत्याही परिस्थितीत विलंब न होता पोहोचला पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून जालना जिल्ह्यातील दिव्यांग बांधवाच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाशी चर्चा करतांना त्या बोलत होत्या. यावेळी अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती मराठवाडा अध्यक्ष जगदीश येनगुपटला, दिव्यांग बांधव दिपक टेहरे, अर्जुन बुकन, अशोक जमदडे,मुन्ना दायमा, शेख अन्वर, अरबाज पठाण, संगिता कोरडे, संगिता लहाने यांची उपस्थिती होती.

या बैठकीत दिव्यांग प्रमाणपत्र वितरण, सहाय्यक साधनांचे वाटप, शैक्षणिक व रोजगाराच्या संधी, अपंगत्व पेन्शन, संजय गांधीं निराधार योजना, अंत्योदय योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग कायदा 2016 ची प्रभावी अंमलबजावणी करणे, प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये दिव्यांग नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी विशेष फलक लावणे, तसेच पायाभूत सुविधा सुलभ करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. दिव्यांग नागरिकांना शासकीय दालनांमध्ये येताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, शिष्यवृत्ती, विशेष शिक्षण साधने यांची उपलब्धता वाढवण्याबरोबरच रोजगाराविषयी मार्गदर्शन शिबिरे घेण्याची गरज जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच, प्रत्येक विभागाने दिव्यांगांच्या तक्रारी तात्काळ नोंदवून त्या वेळेत मार्गी लावाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांनीही प्रशासनासोबत समन्वय साधून काम करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. दिव्यांगांच्या समस्या समजून घेत त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande