
जालना, 3 डिसेंबर (हिं.स.)।
शहरातील रस्ते आणि चौकांचा विकास प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे. या उपक्रमातून शहरात मोठा बदल घडवून आणण्याचे नियोजित आहे. महापालिका व सीएसआर फंडातून जालना शहरातील विविध चौक व रस्ते यांची विशिष्ट बांधणी करुन एक बदल घडवून आणणार तसेच या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे शहरातील पायाभूत सुविधा सुधारण्यास आणि वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. याअंतर्गत शहरातील विविध चौक आणि रस्ते यांची विशिष्ट बांधणी करून शहराचा चेहरामोहरा बदलला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात महापालिका, जालना फर्स्ट आणि विविध उद्योजकांच्या सीएसआर फंडातून प्रायोगिक तत्वावर जालना शहरातील चौक व रस्ते बांधणीसाठी बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका उपायुक्त विद्या गायकवाड, जालना फर्स्टचे प्रतिनिधी तसेच विविध उद्योजकांची उपस्थिती होती. यावेळी त्या बोलत होत्या.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या, शहरातील छत्रपती संभाजीनगर चौफुली ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मोतीबागेपासून परत छत्रपती संभाजीनगर चौफुली असा एकुण 10 किलोमिटरचा रस्ता प्रायोगिक तत्वावार विकसित करण्यात येणार आहे. जालना शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी महापालिका आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) फंडातून एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. महापालिका निधी आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) फंडातून शहरातील विविध चौक व रस्ते यांची विशिष्ट पद्धतीने आणि आधुनिक बांधणी केली जाईल. हा प्रायोगिक तत्त्वावर होणारा बदल अत्यंत महत्त्वाचा असून, या अनुभवाचा उपयोग करून भविष्यात शहरातील इतर भागांमध्येही अशाच प्रकारचे उच्च दर्जाचे विकासकामे हाती घेण्याची योजना आहे. यातून जालना शहराला एक नवीन ओळख मिळवून देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. तसेच यामुळे शहराचे सुशोभिकरणास ही हातभार लागणार आहे. शहराचे रूप पालटण्याच्या उद्देशाने आता प्रायोगिक तत्त्वावर शहरातील रस्ते आणि चौकांचा विकास हाती घेण्यात येणार आहे. तसेच विकसित केलेल्या चौकाची व रस्त्यांची देखभाल पुढील 10 वर्षापर्यंत संबंधित संस्थांनी करणे गरजेचे आहे. असेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis