हर्षवर्धन सपकाळ यांचे चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
मुंबई, 6 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान दिपस्तंभासारखे मार्गदर्शन करत आहे परंतु या संवैधानिक मुल्ल्यांच्या विरोधात काही शक्ती डोके वर काढत आहेत. या शक्तींच्याविरोधात संघर्ष अ
मुंबई


मुंबई, 6 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान दिपस्तंभासारखे मार्गदर्शन करत आहे परंतु या संवैधानिक मुल्ल्यांच्या विरोधात काही शक्ती डोके वर काढत आहेत. या शक्तींच्याविरोधात संघर्ष अनिवार्य असून संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्यासाठी बळकटी मिळावी, यासाठी चैत्यभूमीवर नतमस्तक झालो, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चैत्यभूमीला भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने व शिवाजी पार्क येथे उभारलेल्या वैद्यकीय चिकित्सा व औषध वाटप केंद्राला भेट देऊन तिथे कार्यरत डॉ. मनोज रांका, डॉ. अभिजीत, डॉ. प्रदीप जावळे, डॉ. अमित दवे, डॉ. मनोज उपाध्याय यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजन भोसले, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. संदेश कोंडविलकर, श्रीरंग बर्गे, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीनं, दिनेश वाघमारे, प्रशांत धुमाळ यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, जगभरातमध्ये गुलामगिरी व शोषण हा समाजव्यवस्थेला लागलेला एक कलंक होता. या गुलामगिरीचे बंधन तोडून ज्या महामानवांनी सामाजिक न्याय, समता व बंधुतेची हाक दिली त्यातील मोठे नाव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, पीडीत व शोषितांचा मोठा लढा लढला व समाजात समतेची बिजे रोवली आणि हाच भाव त्यांनी भारताच्या संविधानातून साकार केला आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

मेट्रो स्टेशनला बाबासाहेबांचे नाव देण्याची मागणी होत आहे, यावर बोलताना सपकाळ म्हणाले की, जे उद्योगपती सरकारला इलेक्ट्रोरल बाँडच्या माध्यमातून पैसे देतात त्यांचीच नावे मेट्रो स्टेशनला दिली जातात हे आपण सिद्धीविनायक, महालक्ष्मी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्टेशनला दिलेल्या नावावरून पाहिले आहे. त्यामुळे मागणी रास्त असली तरी भाजपा सरकार ते मान्य करेल असे वाटत नाही. ज्या भागाला महामानवांचे संदर्भ आहेत, त्यांचा वारसा आहे त्यांची नावं दिली पाहिजेत पण भाजपा आपलेच घोडे दामटवत आहे. नवी मुंबई विमानतळाला भूमीपुत्र दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत आहे तीही रास्तच आहे पण त्याला एनएम विमानतळ म्हणजे नरेंद्र मोदी विमानतळ असे म्हटले जात आहे, असे सपकाळ म्हणाले..

इंदू मिल स्मारकाला विलंब...

सरकारला ज्या कामातून मोठा मलिदा मिळतो तीच कामं भाजपा सरकार प्राधान्याने करते. समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग हे त्यातीलच आहेत. याच समृद्धीतून आमदार फोडून ५० खोके एकदम ओके चा कार्यक्रम पार पडला, आता मध्य भारतातील खाणीतून मोठ्या प्रमाणात लाभ मिळावा यासाठी एका उद्योगपती साठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाला जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. भाजपा हा महामानवांविरोधात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत दिलेली कोणती आश्वासने पूर्ण केली म्हणून इंदू मिलमधील स्मारकाचे आश्वासन ते पाळतील म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवावा, असा प्रतिप्रश्न सपकाळ यांनी केला आहे.

इंडिगो विमानसेवेच्या गोंधळावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकारने खाजगी कंपन्यांना रान मोकळे करून दिले आहे. सरकारचे कोणतेही नियंत्रण या कंपन्यांवर राहिलेले नाही. प्रवाशांची लूट सुरु आहे. हवाई वाहतूक मंत्री व मंत्रालय अस्तित्वात आहे की नाही अशी परिस्थिती आहे. इंडिगोचा गोंधळ व प्रवाशांना झालेला प्रचंड त्रास हे भाजपा सरकारचा नाकर्तेपणा व अपयशाचे आणखी एक उदाहरण आहे, हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande