
मुंबई, 6 डिसेंबर (हिं.स.)। आपल्या विभागाचा जनसंपर्क मजबूत करण्याच्या उद्देशाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी www.pratapsarnaik.com ही अधिकृत वेबसाइट आता सर्वांसाठी खुली केली आहे. या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या लोकप्रतिनिधींसोबत थेट संपर्क साधण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या “Subscribe” बटणावर क्लिक करून नागरिकांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिवहन मंत्री म्हणून मोटार परिवहन विभागाशी संबंधित , एसटी महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने एसटी संदर्भातील, तसेच पालकमंत्री धाराशिव म्हणून धाराशिव जिल्ह्याशी निगडित आणि लोकप्रतिनिधी या नात्याने मतदारसंघातील ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील जनतेला आपल्या समस्या, तक्रारी आणि सूचना या संकेतस्थळावर मांडता येतील. त्याचा तातडीने निपटारा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली असून या द्वारे संबंधित तक्रारदाराची तक्रार अथवा सूचना यावर मंत्री महोदयांच्या ' रिमार्क ' सह योग्य ती कार्यवाही करून त्यांना (संबंधित तक्रारदार )त्याची पोच देण्यात येणार आहे. जेणेकरून पुढील पाठपुरावा त्यांना करणे शक्य होईल. या सुविधेमुळे संबंधितांना आपल्या तक्रारीचे निराकरण होण्याबरोबरच विविध उपक्रम, निर्णय व घडामोडींबाबतची सर्व माहिती तत्काळ मिळणार आहे.
स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा
माझ्या मतदारसंघातील नागरिकांना व मंत्री या नात्याने माझ्या विभागाशी संबंधित जनतेच्या अडचणी, तक्रारी किंवा सूचना यांना प्राधान्य देत वेबसाईटवर Grievances विभाग (तक्रार निवारण केंद्र) उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विभागाच्या माध्यमातून मांडलेल्या तक्रारी सरकार दरबारी प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ! असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. तसेच लवकर मराठी भाषेत देखील उपरोक्त संकेत स्थळ विकसित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या नव्या डिजिटल उपक्रमामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक वेगवान व पारदर्शक होण्याची अपेक्षा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर