
नवी दिल्ली, 6 डिसेंबर (हिं.स.)टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान मानेच्या दुखापतीची तक्रार केल्यानंतर संपूर्ण मालिकेसाठी संघाबाहेर असलेला एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार शुभमन गिलने सेंटर ऑफ एक्सलन्स येथे त्याचे पुनर्वसन पूर्ण केले आहे आणि सर्व फॉरमॅटमध्ये मैदानावर परतण्यासाठी त्याला तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. यामुळे आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी तो परतण्याची तयारी दर्शवित आहे.
गिलला यापूर्वी कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. गुवाहाटीतील दुसरी कसोटी आणि मानेला झालेल्या दुखापतीमुळे तो चालू एकदिवसीय मालिकेला मुकला होता. गिलबाबत, बोर्डाने यापूर्वी एका निवेदनात म्हटले होते की, गिलचा सहभाग बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने त्याच्या फिटनेसला मंजुरी दिल्यावर अवलंबून असेल, ज्याला आता मान्यता देण्यात आली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका ९ डिसेंबरपासून कटक येथे सुरू होईल. संघ निवडण्यासाठी बुधवारी निवड समितीची बैठक झाली. सूर्यकुमार यादव हा भारताचा नियमित टी-२० कर्णधार आहे. पाच सामन्यांची मालिका ९ डिसेंबर रोजी कटकमध्ये सुरू होईल. इतर सामने चंदीगड (११ डिसेंबर), धर्मशाला (१४ डिसेंबर), लखनौ (१७ डिसेंबर) आणि अहमदाबाद (१९ डिसेंबर) येथे खेळवले जाणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे