
रायगड, 8 डिसेंबर (हिं.स.)। क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२५ अंतर्गत होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट निवड चाचणी स्पर्धेसाठी अलिबाग तालुक्याची गुणवंत विद्यार्थिनी तनिष्का वारगे हिची निवड झाली आहे.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात सेंट मेरी ज्युनिअर कॉलेज, अलिबाग येथे शिक्षण घेत असलेली तनिष्का हिने सातत्यपूर्ण मेहनत आणि दमदार खेळाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. राज्यस्तरीय क्रिकेट निवड चाचण्या अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आल्या असून, विभागीय स्तरावर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे तनिष्काने राज्यस्तरापर्यंत मजल मारली आहे. तिच्या निवडीमुळे अलिबाग तालुक्यात क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशाबद्दल सेंट मेरी ज्युनिअर कॉलेज व हायस्कूलच्या वतीने विशेष अभिनंदन व्यक्त करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, क्रीडा मार्गदर्शक यतीराज पाटील, प्राचार्या बेरिल मॅडम तसेच शिक्षकवृंद यांनी तनिष्काचे कौतुक करत तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयातील शिस्तबद्ध प्रशिक्षण, नियमित सराव आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तनिष्का वारगे हिच्या निवडीमुळे संपूर्ण अलिबाग तालुका आणि रायगड जिल्ह्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. लहान गावातून पुढे येत राज्यस्तरीय स्पर्धेत पोहोचलेली ही यशोगाथा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आगामी राज्यस्तरीय निवड चाचण्यांमध्ये तनिष्का कडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके