
पुणे, 8 डिसेंबर (हिं.स.)। आगामी महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष महायुती म्हणूनच लढणार आहे. मात्र, महायुती म्हणून जिथे निवडणूक लढविणे अशक्य आहे, त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार असून, त्याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे. दरम्यान, पक्षाची ताकद वाढेल, अशा ठिकाणीच अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल. तर, पक्षसंघटना मजबूत असेल, तिथे कार्यकर्त्यांनाच प्राधान्य देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेची निवडणूक होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या सुकाणू समितीची (कोअर कमिटी) बैठक केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झाली. त्यात हे निर्णय घेण्यात आले. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर तसेच निवडणूक प्रमुख गणेश बीडकर, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती मोहोळ यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु