पालघर : चौकशीसाठी बोलावलेल्या तरुणीवर हवालदाराकडून अत्याचार
पालघर, 8 डिसेंबर (हिं.स.)। चौकशीसाठी बोलावलेल्या तरुणीवर हवालदाराने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या घटनेने पोलिस विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे. आरोपी हवालदाराला अटक करण्यात आली असून घटनेची गंभीर दखल घेत प्रभारी पोलिस निरीक्षक
चौकशीसाठी बोलावलेल्या तरुणीवर हवालदाराकडून अत्याचार;कासा पोलिस ठाण्यातील धक्कादायक प्रकार


पालघर, 8 डिसेंबर (हिं.स.)। चौकशीसाठी बोलावलेल्या तरुणीवर हवालदाराने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या घटनेने पोलिस विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे. आरोपी हवालदाराला अटक करण्यात आली असून घटनेची गंभीर दखल घेत प्रभारी पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

कासा पोलीस ठाण्यातील हद्दीतील २१ वर्षीय पीडित महिलेने २५ ऑक्टोबर रोजी पतीने एका तरुणीसोबत घर सोडल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने हवालदार शरद भोगाडे (४१) यांनी चौकशीसाठी २१ वर्षीय तरुणीला अनेक वेळा पोलिस ठाण्यात बोलावले. चौकशीच्या नावाखाली तरुणीसोबत भोगाडे यांनी अनुचित जवळीक साधल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, २९ नोव्हेंबर रोजीही तिला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी हवालदाराने विश्वास संपादन करून तिला पोलिस ठाण्याच्या मागील वसाहतीतील खोलीत नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मानसिक धक्क्यात असलेल्या तरुणीने अखेर धाडस करून ७ डिसेंबर रोजी डहाणू पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. डहाणू पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी कासा पोलिसांकडे वर्ग केला. त्यानंतर आरोपी हवालदार भोगाडे याला ७ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता अटक करण्यात आली.

प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पालघर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तत्काळ कारवाई करत कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अविनाश मांदळे यांची बदली पोलिस मुख्यालयात केली आहे. त्यांच्या जागी पोलिस निरीक्षक अमर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. महिला संरक्षणाची जबाबदारी असलेल्या खात्यातीलच कर्मचाऱ्याकडून अत्याचाराची घटना घडत असल्यास महिलांनी दाद कुणाकडे मागायची? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. स्थानिक पातळीवरून आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande