पुणे - प्राथमिक आरोग्य केंद्रांची सेवा होणार अधिक सक्षम
पुणे, 8 डिसेंबर (हिं.स.)।जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची सेवा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘नाइट पर्यवेक्षण स्कॉड’ नियुक्ती केली असून, रात्री अचानक तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांसह इतर कर्मचारी उपस्थित नसतील तर त्यांच्या
पुणे - प्राथमिक आरोग्य केंद्रांची सेवा होणार अधिक सक्षम


पुणे, 8 डिसेंबर (हिं.स.)।जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची सेवा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘नाइट पर्यवेक्षण स्कॉड’ नियुक्ती केली असून, रात्री अचानक तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांसह इतर कर्मचारी उपस्थित नसतील तर त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई होणार आहे. रुग्णालयातील कर्मचारी उपस्थिती, आपत्कालीन सेवा आणि रुग्णसेवेची स्थिती बारकाईने पाहण्यात येत आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची आणि ग्रामीण रुग्णालयांची सद्यःस्थिती सकाळने वृत्तमालिकेतून मांडली होती. त्यामध्ये चांगल्या आरोग्य केंद्रांचे कौतुकही केले तर नागरिकांची गैरसोय झालेल्या ठिकाणी बोट ही ठेवले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून काही अधिकाऱ्यांना नोटीस ही पाठवली होती. त्यानंतर आता सर्वच दवाखान्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये रात्री प्रत्यक्ष कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, याचे अचूक आकलन प्रशासनाला मिळावे, असा उद्देश या तपासण्यामागे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, आरोग्य केंद्रांसाठी कागदोपत्री नोंदींपेक्षा प्रत्यक्ष हालचालींची पडताळणी महत्त्वाची ठरत आहे. गेल्या काही महिन्यांत ग्रामीण भागातील काही रुग्णालयांत रात्रपाळीत डॉक्टर नसणे इतर कर्मचारी वेळेत न पोहोचण्याच्या प्रशासनाकडे तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाने रात्री आरोग्य केंद्रांची व्यवस्था पाहण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांना अचानक भेट देत आहेत. कामाच्या ठिकाणी हलगर्जीपणा आढळला तर कारवाई केली जाणार आहे. आरोग्य पथकासह इतर विभागातील प्रमुख देखील आरोग्य केंद्रांची तपासणी करणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande