
पुणे, 8 डिसेंबर (हिं.स.)।मागील आठ दिवसांपासून इंडिगो; विमान सेवा विस्कळीत झाल्यामुळे अनेक विमाने उड्डाण रद्द झाली. परिणामी पुण्यातून वेगवेगळ्या शहरांसाठी जाणाऱ्या हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी पुणे रेल्वे विभागाने काही विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, प्रवाशांना रेल्वेतून कसा प्रवास करता येईल, याची माहिती देण्यासाठी पुणे विमानतळावर मदत कक्ष सुरू केला आहे.
पुण्यासह मुंबईत गेल्या काही दिवसांपासून विमान सेवा विस्कळित झाली आहे. दररोज पु्ण्यात येणारी आणि जाणारी ४० पेक्षा जास्त विमाने रद्द होत आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांना विमानतळावर तासंतास थांबावे लागत आहे. विमान रद्द झाल्याचे समजल्यावर बॅगा घेण्यासाठीही एक ते दोन तास वेटींग करावे लागत आहे. इंडिगोची विमाने रद्द झाल्यामुळे इतर कंपन्यांची तिकीटे महागली आहेत. तसेच, विमानतळ परिसरातील हॉटेलचे दर देखील वाढले आहेत. त्यामुळे प्रवाशांना दुसऱ्या पर्यायाने प्रवास कसा करता येईल, यासाठी पुणे रेल्वे विभागाने विमानतळावर मदत कक्ष सुरू केला आहे. या ठिकाणी रेल्वेचे दोन अधिकारी कायम उपस्थित असतील. ते प्रवाशांना विमान रद्द झाल्यास रेल्वेने कसा प्रवास करता येईल. याची माहिती देत आहेत.त्यासाठी तिकीट बुकींगपासूनची सर्व आवश्यक माहिती, मदत दिली जाणार आहे. या सेवाचा प्रवाशांना खूप फायदा होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु