
पुणे, 8 डिसेंबर (हिं.स.)।नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालू सन २०२५-२६ च्या रौप्यमहोत्सव गळीत हंगामामध्ये प्रतिटन रुपये ३१०१ प्रमाणे उच्चांकी उचल विना कपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली असून, शेतकऱ्यांना अधिकच्या ऊस दरासाठी चालू हंगामामध्ये ७ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथे नीरा भीमा कारखाना कार्यस्थळावर शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रमांमध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी कारखान्याच्या इतिहासामध्ये प्रथमच उच्चांकी अशी प्रतिटन रु. ३१०१ प्रमाणे उचल जाहीर केल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या सह संचालक मंडळाचा सत्कार केला.कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, ज्ञानेश्वर वाघ, विलास ताटे देशमुख आदींसह शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे तर आभार उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांनी मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु