बस वाहतूकदार संघटनांसोबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथे बैठक
पिंपरी 8 डिसेंबर (हिं.स.)हिंजवडी येथे नुकत्याच घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत बस वाहतूकदार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक आज पार पडली. बस वाहतुकीतील सुरक्षितता, प्रवासी संरक्षण आणि शहरातील व
बस वाहतूकदार संघटनांसोबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथे बैठक


पिंपरी 8 डिसेंबर (हिं.स.)हिंजवडी येथे नुकत्याच घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत बस वाहतूकदार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक आज पार पडली. बस वाहतुकीतील सुरक्षितता, प्रवासी संरक्षण आणि शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान बस चालकांनी निर्धारित वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून वाहने सुरक्षितपणे चालवावीत, यासाठी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमार्फत चालकांना आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. तसेच बस चालकांसाठी आयोजित करण्यात येत असलेल्या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात सर्व चालकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. प्रवाशांच्या तक्रारी तत्काळ नोंदविण्यासाठी प्रत्येक बसमध्ये स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक प्रदर्शित करावा, अशी सूचना यावेळी संघटनांना देण्यात आली. काही बस मालकांनी आपल्या वाहनांमध्ये ‘ब्रेद अ‍ॅनालायझर’ प्रणाली स्वखर्चाने बसविल्याची माहितीही देण्यात आली. या प्रणालीद्वारे चालकाची अल्कोहोल तपासणी पूर्ण झाल्याशिवाय बस सुरू होत नाही. इतर बस मालकांनीही ही प्रणाली स्वीकारून बसमध्ये बसवावी, असे आवाहन करण्यात आले. संघटनांमार्फत बस व चालकांची संपूर्ण माहिती समाविष्ट करणारे स्वतंत्र अ‍ॅप विकसित करण्याचे काम प्रगत अवस्थेत असून, त्याबाबतची माहितीही बैठकीत देण्यात आली. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत हिंजवडी, चाकण व परिसरातील मार्गांवर बसची विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून नियमबाह्य व दोषी वाहनांवर कडक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बस सेवेमुळे प्रवाशांचे हित, वाहतुकीतील शिस्त आणि सुरक्षितता यांना प्राधान्य देण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड यांनी यावेळी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande