अभिजात मराठी भाषा आणि आम्ही
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासनाने गेल्या ऑक्टोबर २०२४ मध्ये दिला आहे. मराठी माणसाला अभिमान वाटावा अशीच ही घटना आहे. या करीता अनेक वर्ष मागणी करण्यात आली. कोमसाप व इतर संघटनानी ही बाब लावून धरली, त्याला आता यश आले आहे. मराठी भाषेला दोन ह
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन


मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासनाने गेल्या ऑक्टोबर २०२४ मध्ये दिला आहे. मराठी माणसाला अभिमान वाटावा अशीच ही घटना आहे. या करीता अनेक वर्ष मागणी करण्यात आली. कोमसाप व इतर संघटनानी ही बाब लावून धरली, त्याला आता यश आले आहे. मराठी भाषेला दोन हजार वर्षापेक्षा अधिक मोठा इतिहास आहे. या भाषेत प्राचीन काळापासून खूप साहित्याची निर्मिती होत आहे ही भाषा स्वंयभू आहे अनेक बोली भाषांनी ती नटलेली आहे अजूनही अनेक बोलींचा अभ्यास होणे बाकी आहे. मराठी भाषा अशा विविधतेनी समृध्द आहे

भाषा ही विचारांच्या देवघेवीचे एक मौखिक आणि लिखित असे साधन आहे भाष् करणे म्हणजे बोलणे अथवा लिहिणे या धातू पासून 'भाषा' हा शब्दाचे अस्तित्व निर्माण झाले कोणतीही भाषा हे विचाराचे देवाण घेवाण करण्याचे साधन असते त्या भाषेचे श्राव्य रूप बोलावयाची भाषा, बोलीभाषा असते भाषा जेव्हा लिपीबध्द होऊन दृश्य रूप घेते तेव्हा ती प्रमाण भाषा किंवा ग्रांथिक लिखित भाषा होते तेव्हा तिचे बोलीपण संपते भाषा ही प्रवाही असते, जी भाषा जिवंत असते ती सतत बोलली जात असते समाजाच्या मोठ्या समूहाकडून तिचा वापर होत असतो जेव्हा तिचा वापर कमी होतो तेव्हा ती मृत होते किंवा संपुष्टात येते भाषेत कालपरत्वे, विभागापरत्वे बदल होत जातो दर बारा कोसावर पाणी आणि भाषा बदलत असते असे म्हणतात ते खरे आहे. सांस्कृतिक आक्रमणेही भाषा बदलास कारणीभूत असतात. वास्तव

भाषा ही एक अशी एक महत्वाची गोष्ट आहे जिच्यामुळे निसर्गापासून इतर प्राण्याहून माणूस प्रगत ठरला आहे. सांस्कृतिक भांडवला मधला भाषा हा महत्वाचा घटक आहे या महत्वाच्या भाषा निमिर्तीची प्रक्रिया गेली पाच लाख वर्ष सातत्याने सुरू आहे भाषातज्ञांच्या अंदाजानुसार अस्तित्वात असलेल्या सहाहजार भाषांपैकी २२व्या शतकाच्या पर्यत यातील यातील दोन हजार भाषा टिकणारही नाहीत समाजाच्या गरजा बदलत असतात मग त्यानुसार भाषाही बदलत जाते. दहा हजार वर्षापूर्वी शेतीचा शोध लागल्या नंतर मानवी जीवनाला स्थैर्य मिळू लागले आणि भाषेची गरज व्यक्त होण्यासाठी भासू लागली आणि वेगवेगळ्या भाषा अस्तित्वात आल्या लिपीचा शोध लागून लेखन कला उदयास आली.

आमची मराठी भाषा अभिजात नाही का ?' असा प्रश्न अनेकदा पडत होता मराठी साहित्य संमेलनात एक तंबू उभारून पत्रे लिहून वारंवार केंद्रशासनाला विनंती केली जात होती आता ही मागणी पूर्ण झाली आहे. १२ कोटी मराठी माणसाना आनंद झाला आहे या वर्षी राजधानी दिल्लीत ९८ वे भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हा ही अमृतयोग आहे मराठी माणसांचा हा कुंभमेळा आता दिल्लीत भरणार आहे.

मराठी भाषा किती तरी प्राचीन आहे. संस्कृत जेव्हा ज्ञानभाषा होती तेव्हा प्राकृत ही जन सामान्यांची बोली भाषा होती. या प्राकृत भाषेतून पुढे अनेक भारतीय भाषांची निर्मिती झाली अडीच हजार वर्षापूर्वी महाराष्टासह कर्नाटक आंध्र प्रदेशावर सातवहानांची सत्ता होती महाराष्ट्राचा समावेश या पंच द्राविडामध्ये केला जातो मराठी प्राकृत भाषेचे संदर्भतेव्हापासून उपलब्ध आहेत. सातवाहान राजा हाल यांने (इ.स. २०-२४) या काळात 'गाथा सप्तशती ग्रंथ लिहिला गेला त्यातील वर्णन शृंगारीक असले तरी सामाजिक स्थिती दर्शक आहे. यातील एक द्वीपदी पहा.

अलिहिज्जूड पडक आले हलाली चलणेण कलम गोविए केआर इसोअ रूम्भण तंसटटी अ कोमलो चरणे //६९०//

भावार्थ :- शेतातील प्रवाह रोखल्याने तिरपी पडलेल्या साळीची (भातशेतीची) राखण करणारणीची (शेतकऱ्याच्या सुंदर बायकोची) कोमल पावलांची पाउलवाट आता नांगराच्या रूम्भणीने मिटली आहे आजही 'रूमण' या शब्दाचा वापर ग्रामीण बोलीत केला जातो सातवहान हे कानडी तेलगू भाषीक होते सत्ताधारी संस्कृतीचा प्रभाव भाषेवर होत असतो तेव्हाही झाला. ताई, आक्का, आप्पा, असे अनेक कानडी शब्द मराठीत आहेत पुढे यादवानी सातवहानाचा पराभव केल्यावर मराठी भाषीक यादवाची राजसत्ता आली आणि मराठी भाषा बहरू लागली शके १११० मध्ये मुकुंदराज या कवीने विवेकसिंधु या काव्यग्रंथाची मराठीत रचना केली. ज्ञानेश्वरांच्याही आधी नाथपंथीय मुकूंद रायानानी 'विवेकसिंधू' हा प्राकृत भाषेतील ग्रंथ लिहिला संस्कृतच्या अवघड ओझ्याखाली सर्वसमान्याना दबून रहावे लागे काही वर्गाला ती शिकण्याचा अधिकारही नसे बहुजन वर्गाला ज्ञानापासून वंचित रहावे लागत असे प्राकृत मराठी ही ग्रंथाची भाषा झाली संतानी कटाक्षाने प्राकृतचा वापर केला मुकुंदराय मराठीची थोरवी गाताना लिहितात (मुकुंदराया बाबतही तज्ञामध्ये एकमत नाही ते एक की दोन असाही घोळ आहे)

वेदशास्त्रांचा मतितार्थ मन्हाठीया जोडे फलीतार्थ

तरी चतुरी परमार्थ का ने द्यावा

सुकाळू होद्यावा ब्रम्हविद्येचा

शंकरोक्तीवरी मी बोलीलो मन्हाठी वैखरी

मराठी भाषेला बोलीला 'वैखरी या सुंदर शब्दाचा सुरूवातीचा प्रथम वापर मुकुंदरायानी केला हीच मालीका पुढे सुरू झाली. महानुभपंथीय ग्रंथ 'लिळाचरित्र व ज्ञानेश्वरी' याच काळात लिहिली गेली मराठी आणि कानडीची फारकत यादव काळापासून झालेली दिसून येते. मराठी भाषेला धर्माचे तानाचे स्थान महानुभव पंथानेही मिळवून दिले. श्री चक्रधर स्वामीनी निरूपण केलेल्या मराठी भाषेचाच वापर करा असा नागदेवाचार्याचा आदेश असे संस्कृत मराठी संघर्ष महानुभवानाही करावा लागला संस्कृतचे दामोदर पंडीत व केशीराज यांनी संस्कृतमध्ये काही प्रश्न विचारताच नागदेवाचार्य म्हणाले,

तुमचा अस्मात करमात, मी नेणे गाः

मज श्री चक्रधरे निरूपली मन्हाठी : तियाची पुसा :

तेराव्या शतकातही केवढा मराठीचा अभिमान महानुभावाना होता असा मराठीचा अभिमान व आग्रह आज ठेवला तरच ती टिकेल. मराठीची महती सांगताना ज्ञानेश्वरांनीही लिहिले आहे की,

माझा मराठाची बोलू कौतुके

परि अमृतातेही पैजा जिंके

ऐसी अक्षरे रसिके मेळविन

परंतू अनेक सत्ताधिशांचा अंमल या महाराष्टावर झाला, मराठी भाषे इतकी अवहेलना कुठल्याच देशी भाषेची झाली नाही अगदी आजपर्यंतही तीच अवहेलना चालू आहे पण पूरातल्या लव्हाळी सारखी ती टिकून आहे मराठी भाषेचा गोडवा आणि थोरपणा माऊली सांगतात. ते परिसां महाटे बोल, जे समुद्राही हुनी खोल अर्थ भरीत,

जैसे बिंब बचके एवढे परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडे

अगा शब्दाची व्याप्ती तणे पाडे अनुभवावी यादवांच्या काळानंतर सुलतानशाही, मोंगलाई, बहामनीकाळात अनेक फारसी उर्दू शब्दांचा शिरकाव मराठीत झाला उदा. जमात, अर्ज, शमा, फानस (कंदील) हुजूर, मेहरबान, खबर इ. शिवशाहीत पुन्हा मराठीला बहर आला फारसी शब्दांना वगळण्याचा प्रयत्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज भाषा शुध्दीकरणा बाबत फार आग्रही होते त्यांनी पर्यायी संस्कृत शब्दांचा पुन्हा वापर केला राजांनी मराठी राजव्यवहार कोष लिहून घेतला. पुन्हा पेशवाईत मराठी थोडीफार बदलली असली तरी यादवकालीन प्राकृत ग्रामीण समाजात रूढ झाली होती. पुढे १८१८ नंतर इंग्रजांची सत्ता महाराष्टावर आली पुन्हा एक नवे भाषिक आक्रमण झाले टेबल, शर्ट, रेल, बस, सायकल, बॅग, कप, पार्टी, बुक, या सारखे अनेक नवे शब्द आले शासकीय कामकाजात इंग्लीश आली शिक्षणात इंग्लीश आली इंग्लीश राजवटीत इंग्लीश प्रशासनात आली तिने मराठीस हिन दिन केले त्याकाळात मराठी माणसाच्या भाषेचे अभ्यासक्रमाचे शुध्दलेखनाचे निर्णयही इंग्लीश अधिकारी घेत असत. मेजर कॅण्डी नावाचा इंग्रज शिक्षण अधिकारी मराठी माणसांच्या बोकांडी बसला होता. मराठीचं लिखाण यादव काळापासून पेशवाई पर्यत मोडी लिपीत केले जात असे. परंतू इंग्रजानी ते देवनागरी लिपीत करण्याचे फर्मान काढले मराठी भाषा हिंदीला जवळ गेली मग अनेक हिंदी शब्दांचा भरणा झाला सोहळा पार पडला ऐवजी सोहळा संपन्न झाला, मी तिला समजाविले ऐवजी मी तिला मनविले लिहीले जावू लागले पुण्याच्या आसपासची मराठी हिच प्रमाण मराठी भाषा आहे असे तेव्हा मेजर कॅण्डीने जाहीर केले होते परंतू कोकणातून नशीब काढण्यासाठी, कामधंदा नोकरी मिळविण्यासाठी शिक्षणासाठी अनेकांनी पुण्यात वस्ती केली होती मेहुणपुरा भागात कोकणवासीयांची फार दाटी असे, शिक्षकी पेशातही बरेच लोक कोकणी असत त्यांचे भाषिक वळणही कोकणी असे, पाहिल्यांनी, गेलान, मशी, तुशी, मेजके, अनुनासिक शब्दोच्चार इ. प्रचलीत होते ते शब्द मेजर कॅण्डीने अमान्य केले मेजर कॅण्डीने घालून दिलेले सर्वच नियम मराठी माणसांनी मान्य केले नाहीत अनेक लेखकांनी त्या विरूध्द आवाजही उठविला होता व चुकाही निदर्शनास आणल्या होत्या, माधव ज्यूलीयन यांनी ऐशी नव्वद वर्षापूर्वीच लिहिले आहे.

मराठी असे आमुची मायबोली

परि आज ती राजभाषा नसे

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू

हिला बैसवू वैभवाच्या शिरी

चाळीसच्या दशकात ही कविता लिहीली गेली पुढे काळ बदलत गेला आहे. १९६० साली संयुक्त महाराष्टाची स्थापना झाली द्वीभाषिक गुजरात पासून वेगळे होत मराठी भाषिकांचे राज्याची निर्मिती झाली पंरतू डोक्यावर मुकूट आणि अंगावर फाटके कपडे घातलेली मराठी मंत्रालयाच्या दारात उभी आहे असे कुसुमाग्रजांना खेदाने म्हणावे लागले. जागतिकीकरणामुळे जग जवळ आले आहे. इंग्रजी ही जागतिक संवादाची भाषा झाली आता इंग्लीश शिकणे भाग पडले आहे नोकरी धंदयासाठी ते सक्तीचे वाटू लागले गोरे गेले पण मानसिक पराधिनता संपली नाही अगदी खेडोपाडी, झोपडपटटीतही इंग्लीश माध्यमाच्या शाळांत मुलांनी शिकणे आवश्यक वाटू लागले आहे अशा शाळांचे पेव फुटले आहे समाजाची मानसिकता बदलली आहे. आज सरकारी व मराठी माध्यमांच्या शाळा रित्या झाल्या आहेत जिल्हा परीषदेच्या शाळांमध्ये हिंदी भाषिकांची मुले शिकत आहेत खागजी शाळांमध्ये भरमसाट फी आकरली जाते तीही कळ सोसून गरीब पालक भरतात. पटसंख्या कमी होत असल्याने सरकारी शाळा ओस पडत आहेत मराठी माध्यमा बाबत वेगळा पगडा समाजावर पडला आहे केवळ इंग्लीश माध्यामाच्या शाळांत आपली मुले शिकली तरच ते पुढील तांत्रिक शिक्षण घेऊ शकतील नोकऱ्या मिळवतील, असा एक मोठा भयानक विचार समजात रूढ झाला आहे. मराठीच्या अधोगतीचे ते एक मोठे कारण आहे. चीन, जपान, रशिया, जर्मनी सारख्या देशात अभ्यासक्रम एकाच स्थानिक भाषेत शिकवला जातो. इंग्रजी केवळ एक जागतिक व्यवहाराची भाषा विषय समजला जातो. मुलांना आपल्या मातृभाषेतच सर्व शिक्षण दिले जाते इंजिनीयरींग, मेडीकल किंवा इतर तांत्रिक शिक्षणही स्थानिक भाषेत दिले जाते महाराष्टातही कायदयाची, विज्ञानाची भाषा आता मराठी होत आहे. भारतात एक मोठा बिकट भाषिक वाद आहे अनेक प्रांताची भाषा वेगवेगळी आहे तामीळ, बंगाली कानडी, मळयालम, आसामी अशा अनेक भाषा प्रांतवार भाषा रचनेमुळे आल्या दक्षिणेत हिंदी बोलली जात नाही पण इंग्रजीत बोलले जाते, परकीय असली तरी इंग्रजी आपल्याला जोडणारी भाषा ठरते आहे हे नाकारता येत नाही. हा प्रादेशिक अस्मितावाद आहे, महाराष्ट कर्नाटक सीमावादही एक भाषावादच आहे.

मराठी भाषा जरी शैक्षणिक माध्यमात कमी पडत असली तरी ती शेकडो वर्ष सजीव रहाणार आहे याचे कारण आश्चर्यकारक आहे, मराठी भाषे इतकी साहित्याची संमेलने कोठेही होत नाहीत, विभागवार संमेलने होतात, बोली निहाय साहित्य संमेलने होतात, ग्रामीण, मुस्लीम मराठी, ख्रिस्ती मराठी, आगरी बोली, मालवणी बोली, झाडी बोली, अहिराणी, अशा अनेक बोलीच्या फांदया एकत्र येवून एक प्रमाण मराठीचे आखिल भारतीय साहित्य संमेलन होते. आता तर ग्रूपनिहाय संमेलने व विद्रोही साहित्याची संमेलने, नाट्यसंमेलने गजल संमेलने अशी होतात. शेकडो कवी, लेखक लिहित आहेत. यातून मराठी भाषेचा सतत जागर होत आहे अनेक पुस्तकांची दरमहा प्रकाशने डौलात होत आहेत, पण असे एक चित्र असताना प्रश्न पडतो मराठी माध्यमाच्या शाळा मात्र रिकाम्या रहात आहेत. मराठी भाषा मरणार तर नाही ना ? अशी भिती वाटते पहिले मराठी साहित्य संमेलन झाले तेव्हाही हाच मुददा होता (१९२६) मराठी भाषा टिकेल का? गेली शंभर वर्षे हाच सवाल विचारला जातो तरीही अनेक वर्षे कात टाकूनही मराठी अस्तित्वात आहे सर्वसमावेश मराठी माणूस असल्याने देशांच्या काना कोपऱ्यातून माणसे जगण्यासाठी मुंबईत, (देशाच्या आर्थिक राजधानीत) नोकरी धंदयासाठी महाराष्टात येतात, येताना आपली संस्कृतीही सोबत आणतात त्याचीही भेसळ करतात. दूधवाला, भेळवाला इस्त्रीवाला भैया असतो इडलीवाला अण्णा असतो, गुजराती, मारवाडी व्यापारी असतो तो काहीही कष्ट न करता शेतकऱ्याचा माल विकून दलालीत नफा कमवितो. मराठी माणूस मात्र त्यांच्यावर अवलंबून असतो. सुरेश भट म्हणतात की-

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी

आपुल्या घरात हाल सोसते मराठी

हे असे कितीक खेळ पाहते मराठी

शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी

मराठी भाषेच्या अधोगतीस आपणच कारणीभूत आहोत मराठीत नव्या पिढीला आपले भवितव्य दिसत नाही महाराष्ट्रातल्या कोणत्याही महाविदयालयात गेलात तर पदवीसाठी पूर्ण मराठी विषय घेतलेले किती विदयार्थी आहेत ? अशी चौवशी केली तर नकारार्थी उतर येते चार पांच विदयार्थीही मराठीसाठी मिळत नाहीत. पर्यायाने मराठीच्या प्राध्यापकास आपल्या विषयास विदयार्थी मिळवताना कसरत करावी लागते अन्यथा पद रिक्त होते. विभाग बंद होतो कलाशाखेत शिकणे कमीपणाचे समजले जाते मराठी पुस्तकाना वाचक नाही, वृतपत्रांचा खप होत नाही मराठी भाषेचे संवर्धन करायचे असेल तर सुरुवात घरापासून करायला हवी आपली मुले, नावर्ड इंग्लीश सेमी मध्ये जरी शिकत असली तरी घरी आवर्जून मराठीत बोलले पाहीजे. येरे येरे पावसाची गोडी त्यांना माहित नसते ते rain rain go away and come onther day म्हणत असतात त्यांना जा रे जा रे पावसा शिकवले जाते आम्ही वाढदिवसाला दिप लावून ओवाळतो आता केकवर मेणबत्या लावून त्या विझवतात हा संस्कृतीचा फरक आहे. उदा. लहान मुलांशी पंचवीसच्या ऐवजी twenty five बोलावे लागते मराठीला सुरूवातीसच ही मुले पोरकी होतात यामुळे संस्कारक्षम वयातच हा घोळ होत आहे. या करीता एक मराठी विषय सुरूवाती पासूनच असावा (यातही हिंदीचा पर्याय शोधला जातो) तो सक्तीचा असावा कुंटुबात, समाजात मराठीच बोलले पाहिजे भाजी बाजारात, प्रवासात, शासकिय कामकाजात, खाजगी आस्थापनात मराठीचा आग्रह धरला पाहिजे. सुरूवात आपणा पासूनच केली पाहिजे.

शासकीय आदेश, परिपत्रके, योजनांची माहिती मराठीतच असावी, तांत्रिक बाबीही मराठीत भाषांतरीत करण्यात याव्यात मराठीत पदवी घेण्याऱ्या कर्मच्याऱ्यास उतेजनार्थ अतिरिक्त वेतनवाढ मिळावी अलिकडे मुंबई महापालीकेत असा प्रयोग केला गेला त्यास कर्मऱ्यानी चांगला प्रतिसाद दिला जिल्हा परिषदात, इतर नगरपालिका, महानगरपालिका व शासकीय कार्यालयात सक्ती करावी इतर भाषिक अमराठी कर्मन्यानी मराठी भाषेची किमान

माध्यमिक स्तरावरची मराठीची परिक्षा देणे अनिवार्य आहे ते कायम असावे माहिती सेवा, मराठीच असावी आर्थिक क्षेत्रातही मराठीचा वापर केला गेला पाहिजे. रोजगार, आय टी क्षेत्रातही मराठीचा वापर करावा मराठी भाषिक युवकाना रोजगात प्राधान्य देण्यात यावे कामकाजात मराठीचा वापर करावा संगणकीय, व तांत्रिक अभ्यासक्रम मराठीत असावेत ग्रामीण भागातील मुले त्यामुळे अधिक वेगाने प्रगती करतील.

महाराष्टात येणाऱ्या परप्रांतियानी आपल्या व्यवहारात मराठीचा वापर अधिक करावा दुकानांच्या आस्थापनेच्या पाटयावर ठळकपणे मराठीत लिहिले जावे, अशा लोकांशी मुददाम मराठीतच बोलावे त्यामुळे त्याना मराठीत व्यवहार करणे गरजेचे वाटेल आपला दबाव त्याच्यांवर आपोआप पडेल.

मुंबई आपली असली तरी बॉलीवुडमध्ये हिंदीभाषिक चित्रपटाची दादागिरी मुंबईत चालते. मराठी चित्रपटाना थिएटर उपलब्ध होत नाहीत किंवा सोईच्या वेळा दिल्या जात नाहीत. त्यामुळे तराठी चित्रपटाना प्रेक्षक उपलब्ध होणाऱ्या वेळा देणे बंधनकारक असावे, मराठी चित्रपट करमुक्त असावेत व चांगल्या चित्रपट निर्मिती करीता अनुदान दिले जावे मराठी नाटकानाही कर सवलत असावी कमी भाडयात नाट्यगृह उपलब्ध केली जावीत जेणे करून मराठी सांस्कृतिक क्षेत्रास उत्तेजन मिळेल. अनेक कलाकाराना रोजगार मिळेल व इतर भाषांच्या स्पर्धेत ते टिकून रहातील. अनेक चांगल्या कलाकृती निर्माण होतील कथाकार गीतकार यांना व्यासपीठ उपलब्ध होईल.

वाचन संस्कृती वाढावी या करीता ग्रंथालयाना शासकिय अनुदान भरघोस मिळावे वाचनालयातील कर्मचारी हा ही शासकिय कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी त्या कर्मच्याऱ्याना अत्यंत कमी वेतानात १२ तास राबविले जाते. वाचनालयात अनेक पुस्तके उपलब्ध होतात तो प्रकाशन व्यवसाय हा उद्योग मानून त्यास कर्ज, व सवलती मिळाल्या तर मराठी लेखकाना कवीना आपले लेखन प्रसिध्द करण्यास अधिक वाव मिळेल. त्यात दर्जेदार साहित्यास पुरस्कार मिळावेत. (वशीले सोडून)

आपल्या शेजारी असलेल्या भूतान या लहानशा देशात भारताच्या मदतीने शैक्षणिक विकास झाला आहे परंतू तेथिल सरकारी शाळा भारतापेक्षा अधिक यशस्वी झाल्या आहेत कारण तेथिल राजा किंवा उच्च अधिकारी, श्रीमंत लोक यांची मुले सरकारी सरकारी शाळेतच शिकतात मग आपोआप इतरांची मुलेही सरकारी जि.प. किंवा नगरपालिका शाळेत जातात त्यांचा शिक्षणाचा दर्जाही खाजगी शाळापेक्षा चांगला असतो या पासून बोध घेता येतो की लोकांमध्ये अगदी खेडोपाडी इंग्रजी माध्यमाचे जे फॅड पसरले आहे ते कमी झाले पाहिजे.

शिवाजी जन्माला यावा पण तो आपल्या घरात नसून शेजाऱ्याच्या घरात यावा आम्ही फक्त तुम लढो -- असे म्हणायचे असे न करता आपल्या घरापासूनच सुरूवात करावी मुलांशी शेजाऱ्यांशी बाजारात मराठीतच बोलावे जर महाराष्टात नोकरी धंदा करायचा तर परप्रांतीयांना कळले पाहिजे इथे मराठीच बोलले पाहिजे. माझे असेही निरिक्षण आहे की परभाषिक हिंदी किंवा अन्य त्यांची दुसरी पिढी जी मुंबईत किंवा महाराष्टात जन्माला आली आहे. ही मुले मराठी उत्तम बोलतात समजतात मुंबई, नवी मुंबईच्या ठाणे, बेलापूर, कल्याण, उरण, पनवेल परिसरात इतर नगरपालिका किंवा जिल्हा परिषदांच्या शाळात नजर टाकली तर असेही चित्र दिसते. अनेक हिंदी भाषिक मुले मराठी शाळांत अधिक शिकतात. पट संख्या वाढावी, नोकरी वाचावी म्हणून प्राथमिक शिक्षक त्यांना गोळा करून आणतात फुकट गणवेश, फुकट पुस्तके, फी माफ इ. या सुविधा ज्या मराठी मुलांकरीता असतात त्याचा लाभभैयांची मुले घेताना दिसतात, गमंत म्हणून एक वात्रटीका मी लिहिली होती.

मराठी मराठी मन से बोलो प्यारे

झेडपीच्या शाळेत शिकती भैयाची पोरे

हे चित्र बदलले तरच शासनांच्या निधीचाही योग्य विनियोग होईल. समाजाचे रहाणीमान बदलले आहे विचारसरणी बदलली आहे ती बदलणे गरजेचे आहे पण मातृभाषेचा अभिमानही असणे आवश्यक आहे शेवटी समाज महणजे काय तर समाजातील माणसे आहेत अनेकजण एकाच विचाराने प्रेरीत झाले तरच हा कारवा नव्हे ही दिंडी पुढे जाईल. अशी अस्मिता जागृत होणे मराठीच्या भविष्याकरीता संवर्धना करीता महत्वाचे आहे.

डॉ. पाटील अविनाश विठ्ठल

एम.ए., एम.फिल, पीएच.डी, डि सी ए. (जर्नालिझम).

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande