महाराष्ट्राबाहेर पुन्हा एकदा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा डंका!
यावर्षी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी नवी दिल्ली येथे होत आहे. या आधी तब्बल बावीस वेळा महाराष्ट्राबाहेर साहित्य संमेलने झाली आहेत. यंदाही हे संमेलन अनेक कारणांसाठी विशेष ठरणार आहे. केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्
९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  बोधचिन्ह


यावर्षी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी नवी दिल्ली येथे होत आहे. या आधी तब्बल बावीस वेळा महाराष्ट्राबाहेर साहित्य संमेलने झाली आहेत. यंदाही हे संमेलन अनेक कारणांसाठी विशेष ठरणार आहे.

केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. यामुळे हे संमेलन ऐतिहासिक असेल. हा सोहळा मराठी भाषिक, साहित्यप्रेमींसाठी एक अभिमानास्पद क्षण ठरणार आहे. यामुळे संपूर्ण भारतभर आणि परदेशात विखुरलेल्या मराठी जनामनास एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. या संमेलनामुळे मराठीचा लौकिक अधिक वृद्धिंगत होईल. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे उद्घाटन हा मराठी भाषिकांसाठी अभिमानाचा क्षण असेल.

अशी आहे मराठी साहित्य संमेलनाची गौरवशाली परंपरा

मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ १८७८ साली पुण्यात रोवली गेली. त्यानंतर महाराष्ट्राबाहेर मराठी साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी अनेक संमेलने महाराष्ट्राबाहेर पार पडली आहेत. विशेष म्हणजे १८७८ साली सुरू झालेली साहित्य संमेलनाची परंपरा आजही सुरू आहे. पहिले संमेलन १८७८ साली पुणे येथे पार पडले.

✒️ यानंतर १९०९ साली म्हणजेच तब्बल २१ वर्षांनी सातवे संमेलन बडोदा (गुजरात) येथे पार पडले.

✒️ १९१७ साली म्हणजेच तब्बल आठ वर्षांनी दहावे संमेलन मध्यप्रदेश मधील इंदूर येथे पार पडले.

✒️ १९२१ साली तब्बल चार वर्षांनी अकरावे संमेलन बडोदा (गुजरात ) येथे पार पडले.

✒️ १९२८ साली तब्बल सात वर्षांनी चौदावे संमेलन मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर येथे पार पडले.

✒️ १९२९ साली पंधरावे संमेलन कर्नाटकमधील बेळगाव येथे पार पडले.

✒️ १९३० साली सोळावे संमेलन गोव्यातील मडगाव येथे पार पडले.

✒️ १९३१ साली सतरावे संमेलन तेलंगणातील हैद्राबाद येथे पार पडले.

✒️ १९३४ साली तब्बल चार वर्षांनी विसावे संमेलन बडोदा (गुजरात) येथे पार पडले.

✒️ १९३५ साली एकविसावे संमेलन मध्यप्रदेशमधील इंदूर येथे पार पडले.

✒️ १९४६ साली तब्बल अकरा वर्षांनी ३० वे संमेलन कर्नाटकमधील बेळगाव येथे पार पडले.

✒️ १९४७ साली ३१ वे संमेलन तेलंगणातील हैद्राबाद येथे पार पडले.

✒️ १९५१ साली तब्बल चार वर्षांनी ३४ वे संमेलन कर्नाटक मधील कारवार येथे पार पडले.

✒️ १९५३ साली ३६ वे संमेलन गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडले.

✒️ १९५४ साली ३७ वे संमेलन दिल्ली येथे पार पडले.

✒️ १९६१ साली ४३ वे संमेलन तब्बल सात वर्षांनी मध्यप्रदेशमधील ग्वालेहर येथे पार पडले.

✒️ १९६४ साली ४५ वे संमेलन गोव्यातील मडगाव येथे पार पडले.

✒️ १९६७ साली ४७ वे संमेलन मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे पार पडले.

✒️ १९८१ साली तब्बल १४ वर्षांनी ५६ वे संमेलन छत्तीसगडमधील रायपूर येथे पार पडले.

✒️ २००० साली ७३ वे संमेलन तब्बल 19 वर्षांनी कर्नाटक मधील बेळगाव येथे पार पडले.

✒️ २००१ साली ७४ वे संमेलन मध्यप्रदेशमधील इंदोर येथे पार पडले.

✒️ २०१५ साली तब्बल 14 वर्षांनी ८८ वे संमेलन पंजाबमधील घुमान येथे पार पडले. त्यानंतर २०१८

✒️ २०१८ साली ९१ वे संमेलन गुजरात मधील बडोदा येथे पार पडले.

यानंतर यंदा तब्बल ७ वर्षांनी पुन्हा २०२५ साली ९८ वे संमेलन महाराष्ट्राबाहेर दिल्ली येथे पार पडणार आहे.

मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्याचा जागर

मराठी ही केवळ एक भाषा नसून शब्द, साहित्य, संगीत, कला आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. संत साहित्यापासून ते आधुनिक काव्यापर्यंत, लोककथांपासून आधुनिक कादंबऱ्यांपर्यंत, नाटकांपासून चित्रपटांपर्यंत मराठी साहित्याचा वारसा अत्यंत समृद्ध आहे.

या संमेलनात मराठी साहित्यविश्वातील मान्यवर लेखक, कवी, समीक्षक आणि रसिक वाचक एकत्र येणार आहेत. विविध चर्चासत्रे, परिसंवाद, ग्रंथप्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांमधून मराठी भाषेचे भवितव्य उजळवण्याचा संकल्प केला जाणार आहे.

या भव्य सोहळ्याचा भाग बना!

दिल्लीतील हे साहित्य संमेलन मराठी संस्कृतीचा उत्सव आहे. साहित्यप्रेमी, लेखक, कवी, विद्यार्थी आणि मराठी भाषा जपणाऱ्या सर्वांनी या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याची ही सुवर्णसंधी आहे. आपली मराठी संस्कृती जपण्यासाठी, तिचा जागर करण्यासाठी आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी आपण सर्वांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे. चला, तर मग मराठी साहित्याचा हा ऐतिहासिक उत्सव दिल्लीच्या ऐतिहासिक भूमीवर भव्य स्वरूपात साजरा करूया!

– वर्षा फडके-आंधळे, वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande