धुळे,, 5 फेब्रुवारी (हिं.स.)धुळे,नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण कराव्यात. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी,असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी (दि.५ फेब्रुवारी) मंत्रालयात धुळे नंदुरबार पाणीपुरवठा योजनेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते. बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा,जलजीवन मिशनचे अभियान संचालक ई.रवींद्रन व विभागाचे मुख्य अभियंता,सह सचिव बी.जी.पवार,मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे धुळे व नंदुरबारचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले,१०० दिवस कार्यक्रमात पाणीपुरवठा व स्वच्छ भारत अभियानाच्या सर्व योजना पूर्ण कराव्यात. कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करावी,कामांना गती देण्यासाठी अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी नियमित भेटी द्याव्यात. वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देश दिले.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची कामे'मिशन मोड'वर करावी
उन्हाळ्याचे दिवस लवकरच सुरू होणार आहे. उन्हाळ्यात ग्रामीण भागात प्रत्येकाला पिण्याचे पाणी सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावे. त्यात नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या आहे. यासाठी ग्रामीण भागात जल जीवन मिशन,पाणी पुरवठा विभागांतर्गत सुरु असलेली पाणीपुरवठ्याची कामे'मिशन मोड'वर दर्जेदार करावीत,असे निर्देश मंत्री श्री गुलाबराव पाटील यांनी दिले. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामकाजाचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर