धुळे, 5 फेब्रुवारी, (हिं.स.) - सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर होण्यासाठी राज्य शासनाने शंभर दिवसांचा कृति आराखडा तयार केला असून या आराखड्यात सात कलमी कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यात या सात कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी. अशी सूचना प्रधान सचिव कृषि (विस्तार) तथा धुळे जिल्ह्याचे पालक सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हा वार्षिक योजना, जिल्हा विकास आराखडा तसेच 100 दिवसांचा कृती आराखडा आढावा बैठक पालक सचिव श्री. रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्ता अमिता दगडे पाटील, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, सहायक जिल्हाधिकारी डी. सर्वानंद, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे,जिल्हा नियोजन अधिकारी छ.रा.कनगरे, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे,यांच्यासह सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालक सचिव श्री. रस्तोगी पुढे म्हणाले की, सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी राज्य शासनाने राज्यातील सर्व विभागांना शंभर दिवसांचा कृति आराखड्यातंर्गत सात कलमी कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. यासाठी सामान्य नागरिकांना घरबसल्या शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय आदिींची माहिती नागरिकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभावीरित्या पोहचविण्यासाठी जिल्हास्तरीय संकेतस्थळावर नागरिकांना अद्यावत माहिती उपलब्ध करुन द्यावी. संकेतस्थळावर दररोज माहिती अपडेट रहावी यासाठी मार्गदर्शीका तयार करुन नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. युजरच्या दृष्टीने दररोज संकेतस्थळ अपडेट करावे. संकेतस्थळ सुरक्षित राहील याची दक्षता घ्यावी. महापालिका, वनविभाग, बांधकाम विभाग, जिल्हा रुग्णालयासह इतर विभागांनीही जिल्ह्यातील दैनंदिन घडामोडींचे अपडेट संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध करुन द्यावे.
त्याचबरोबर शालेयस्तरावरील विद्यार्थ्यांना त्यांचे अत्यावश्यक कागदपत्रे सहज उपलब्ध होण्यासाठी 9 ते 12 वी पर्यंच्या विद्यार्थ्यांचे डी. जी. लॉकर खाते तयार करावे. तालुका, उपविभागीय तसेच जिल्हास्तरावर ई ऑफीसचा वापर करावा. सर्व शासकीय कार्यालयांची स्वच्छतागृहे नेहमी स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. जनतेच्या तक्रारींचा त्वरीत निपटारा करावा. सर्व अधिकाऱ्यांनी वेळोवेळी जिल्ह्यात उपविभाग तसेच तालुकास्तरावर क्षेत्रिय भेटी द्याव्यात. भेटी दिल्यावर क्षेत्रीय भेटीचा फॉर्म भरण्यात यावा. क्षेत्रिय भेटीची माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा सूचना विज्ञान अधिकाऱ्यांनी ॲप विकसित करावे. पोलीस विभागाने जप्त केलेल्या वाहनांचे नियमानुसार निर्लेखन करावे. उद्योग व्यवसायिकांना उद्योगासाठी परवानगी सहज उपलब्ध करुन द्यावी. रुग्णालयातील स्वच्छतेबाबत नागरिकांकडून फिडबॅक घेण्यात यावा. ॲग्रिस्टॅक शेतकरी आयडी तयार करण्याच्या कामास गती द्यावी. कृषी, महसुल, ग्रामविकास विभागाने क्षेत्रीय भेटीदरम्यान या कामांचा आढावा घ्यावा. सीएससी सेंटरधारकांना ॲग्रिस्टॅक शेतकरी आयडी सोबत प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी सूचना द्याव्यात. सर्व शासकीय दस्ताऐवजांचे डिजिटायझेशन करुन ते सहज उपलब्ध होण्यासाठी त्यास कोडवर्ड द्यावेत.
नवीन शाळांचे तसेच वर्गखोल्यांचे बांधकाम सामाजिक दायित्व निधीतून करावे. नविन शाळेचे बांधकाम करतांना शाळा व अंगणवाडीचे बांधकाम एकाच ठिकाणी करावे. शासकीय कार्यालयाचे सर्व्हेक्षण करुन शक्य असेल त्या शासकीय कार्यालयात सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करावा. अनेर, अक्कलपाडा, लळींग येथे पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात. शंभर दिवसांच्या कृति आराखड्यातंर्गत सात कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात चांगल्याप्रकारे अंमलबजावणी होत असल्याबद्दल पालकसचिव श्री. रस्तोगी यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2024-2025 मधील मंजुर तरतूद, प्राप्त निधी, झालेल्या खर्चाचा आढावा, जिल्हा वार्षिक योजना सन 2025-2026 चा प्रारुप आराखडा तसेच जिल्हा विकास आराखड्याच्या माहितीसह जिल्ह्यातील महत्वाचे प्रकल्पांची माहिती पीपीटीद्वारे दिली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नरवाडे, पोलीस अधीक्षक श्री. धिवरे, महापालिका आयुक्त श्रीमती दगडेपाटील यांनी आपआपल्या विभागाचा तर निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गावंडे यांनी महसुल विभागाचा शंभर दिवासांच्या कृति आराखड्यातंर्गत सात कलमी कार्यक्रमाची माहिती बैठकीत दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर