जळगाव, 27 मार्च, (हिं.स.) युक्रेनमधील वैद्यकीय विद्यापीठात MBBS साठी प्रवेश मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन जामनेर तालुक्यातील एका डॉक्टरची ७ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर तालुक्यातील कापूसवाडी येथील डॉ. सुनिल बाबू चव्हाण यांना त्यांच्या मुलाला युक्रेनमध्ये MBBS साठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष मुंबईतील महेश शांताराम वाघमारे, राहुल शर्मा आणि दिल्लीतील प्रेरणा कौशिक या तिघांनी दाखवले. या तिघांनी संगनमताने डॉ. चव्हाण यांच्याकडून वेळोवेळी ७ लाख ३० हजार रुपये उकळले. मात्र, प्रवेशाबाबत कोणतीही प्रगती न दिसल्याने आपली फसवणूक झाल्याचे डॉ. चव्हाण यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने फत्तेपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. डॉ. चव्हाण यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी महेश वाघमारे, राहुल शर्मा आणि प्रेरणा कौशिक या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन पाटील आणि मुकेश पाटील करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर