संभाजी महाराजांवर अत्याचार झालेल्या भूमीवर विद्यार्थी झाले नतमस्तक
अहिल्यानगर दि. 30 मार्च (हिं.स.) :- विद्यार्थ्यांना फक्त चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखविण्यापुरते मर्यादीत न राहता, शालेय विद्यार्थ्यांना संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पेडगाव (ता. श्रीगोंदा) येथील धर्मवीर गडाची सहल घडविण्यात आली. केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) स्कूलच्या वतीने बलिदान मासनिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच शिवकालीन इतिहास विद्यार्थ्यांसमोर जिवंत करण्यात आला.
या सहलीत शालेय विद्यार्थ्यांसह पालक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रारंभी विद्यार्थ्यांना छावा चित्रपट दाखविण्यात आला. त्यानंतर जेथे संभाजी महाराजांवर अमानुषपणे अत्याचार करण्यात आले, त्या धर्मवीर गडावर विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यात आले. अत्याचार झालेल्या भूमीवर विद्यार्थी नतमस्तक होवून संभाजी महाराजांचा जयघोष केला.
संभाजी महाराजांनी स्वराज्य आणि धर्मासाठी बलिदान दिले. हाल-अपेष्टा सहन केल्या, क्रुर पध्दतीची शिक्षा भोगली, मात्र अन्यायापुढे झुकले नाही. हा इतिहास भावी पिढीत रुजविण्यासाठी स्कूलचे प्राचार्य आनंद कटारिया आणि निकिता कटारिया यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आनंद कटारिया म्हणाले की, 120 युद्धे लढून सर्वच्या सर्व युध्दात विजय मिळविणारे संभाजी महाराज हे एकमेव पराक्रमी योध्दे होते. त्यांनी स्वराज्यासाठी दिलेला लढा सर्वांसाठी स्फूर्ती देणारा आहे. त्यांच्या संघर्षापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने विद्यार्थ्यांना सहल घडविण्यात आली. निकिता कटारिया यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाबरोबर आपल्या संस्कृतीचे शिक्षण देवून संस्कारी पिढी घडविण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या उपक्रमात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या पराक्रमावर पोवाडे देखील सादर केले. तर काही विद्यार्थ्यांनी बलिदान मासनिमित्त मोबाईल आणि टिव्हीचा देखील त्याग गेला होता. धर्मवीर गडानंतर सिध्दटेक, आळंदी व देहूचे दर्शन विद्यार्थ्यांना घडविण्यात आले. सहल यशस्वी करण्यासाठी हर्षा कार्ले, वैशाली देशमुख या शिक्षकांनी परिश्रम घेतले.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni