पुणे, 30 मार्च (हिं.स.)।
पुण्यात आयोजित विंटेज आणि क्लासिक कार प्रदर्शनात प्रख्यात व्हिंटेज व क्लासिक कार संग्राहक योहान पूनावाला यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्वल केल्याबद्दल विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियातर्फे विशेष गौरव करण्यात आला. तसेच त्यांच्या संग्रहातील ‘कॉनकोर्सो डी एलिगेंस’ अंतर्गत सर्वोत्कृष्ट विंटेज कार म्हणून १९२७ ची रोल्स रॉयस २० एचपी आणि सर्वोत्कृष्ट क्लासिक कार म्हणून १९५९ ची कॅडिलॅक एल्डोराडो या त्यांच्या दुर्मीळ गाड्यांना पुण्याचे पहिले महापौर कै. बाबुराव सणस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांच्या १९३३ची रोल्स-रॉयस फॅन्टम II या गाडीला कार ऑफ द शो हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. याप्रसंगी सदर्न कमांडचे कमांडर इन चीफ लेफ्टिनेंट जनरल धीरज शेठ, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, व्हिंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन डोसा, सुभाष.बी.सणस व्हिंटेज अँड क्लासिक कार म्युझियमचे सुभाष सणस, निशांत डोसा, झवारे पूनावाला, एनएम टायर्स (एनएमटी)चे अनिल मेहता व निशांत मेहता, सुरेंद्र सणस, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी, सरचिटणीस अर्णव एस., माजी सरचिटणीस व या प्रदर्शनाचे जज सुभाष गोरेगावकर, मोनिशा डोसा आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्कारांना उत्तर देताना प्रदर्शनात प्रख्यात व्हिंटेज व क्लासिक कार संग्राहक योहान पूनावाला म्हणाले की, अशा दुर्मिळ मोटारींचा संग्रह व प्रदर्शन नेहमीच आनंद देते. माझ्या या संग्रहाबद्दल माझ्या कुटुंबीयांनी मोठे सहकार्य केले. तसेच जगात या दुर्मिळ गाड्यांचे प्रदर्शन करतांना माझ्या स्टाफने देखील त्यांच्या कुटुंबापासून दूर राहून मोठा सहयोग दिला. आपल्या देशाचे नाव मी सदैव उंचावत ठेवीन, अशी ग्वाही त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिली. या सत्कारावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी मिशेल पूनावाला व मुले उपस्थित होती.
पुण्यात रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथे दोन दिवस व्हिंटेज व क्लासिक कार व मोटारसायकल स्कूटरचे विनामुल्य प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यास पुणेकरांनी फार मोठा प्रतिसाद दिला. या प्रदर्शनात पुण्याप्रमाणेच मुंबई, गुजरात व गोवा येथूनही संग्राहक सहभागी झाले होते.
याप्रसंगी सर्व पाहुण्यांच्या हस्ते विविध गटातील विजेत्यांना परितोषिके देण्यात आली. या प्रदर्शनाच्या आयोजनात मोठे योगदान देणाऱ्या वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनचे सरचिटणीस अर्णव एस. यांना ‘जजेस स्पेशल अॅवार्ड’ देऊन गौरवण्यात आले.
मिशेलिन इंडिया आणि एन एम टायर्स हे मुख्य प्रायोजक होते. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (RWITC) यांचे सहप्रायोजक होते. तसेच, महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या सहकार्याने आणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन (WIAA) यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा संपन्न झाला. वेंकीज ग्रुप हे देखील प्रायोजक होते.
प्रारंभी व्हिंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन डोसा यांनी स्वागत व आभार प्रदर्शन केले.
सोबत निकाल ...
या विंटेज आणि क्लासिक कार प्रदर्शनात अनेक ऐतिहासिक आणि अप्रतिम स्थितीत असलेल्या गाड्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट देखभाल केलेल्या गाड्यांमध्ये बेस्ट मेंटेनड विंटेज कार’चा वर्गात सुभाष सानस यांच्या १९३० च्या शेवरलेटला आणि साबळे यांच्या १९३४ च्या ऑस्टिन ७ यांनी पटकावली, तर ‘बेस्ट मेंटेनड क्लासिक कार’ वर्गात साबळे यांच्या १९४७ च्या कॅडिलॅक आणि सुभाष सानस यांच्या १९५४ च्या मॉरिस मायनर या गाड्यांनी स्थान मिळवले. बेस्ट मेंटेनड रीसेंट क्लासिक कार विभागात शेखर सावडेकर यांच्या १९७१ फॉक्सवॅगन बीटल आणि समीर ताहिर यांच्या १९५४ हिलमन यांना विजेतेपद मिळाले. ‘बेस्ट मेंटेनड इंडियन हेरिटेज कार गटात’ किशोर बकरे यांच्या १९५७ फिएट एलीगंट आणि धीरज रिटेकर यांच्या १९९१ ११८NE यांनी सर्वोत्तम देखभाल केलेल्या गाड्यांचा मान मिळवला. बेस्ट रिस्टोर्ड विंटेज कार’ गटात हरीत त्रिवेदी यांच्या १९३० फोर्ड मॉडेल A, तर ‘बेस्ट रिस्टोर्ड क्लासिक कार’ गटात बदामिकर यांच्या १९५८ फिएट ५००, ‘बेस्ट रिस्टोर्ड रिसेंट क्लासिक कार’ गटात अमुल्य धनकूर यांच्या १९६९ मर्सिडीज W108, तर भारतीय वारसा गटातील ‘बेस्ट रिस्टोर्ड कार’ पुरस्कार कार्ल भोट यांच्या १९५६ फिएट हेरिटेज आणि श्रीनिवास ठाकूर यांच्या १९५६ फिएट मिलिसेंटो यांना गौरवण्यात आले. सर्वाधिक ओरिजिनल कार पुरस्कार समीर ताहिर यांच्या १९४७ शेवरलेट फ्लिटमास्टर यांना मिळाला. उत्तम युटिलिटी व्हेईकल पुरस्कार राहुल साबळे यांच्या १९३१ डॉज ब्रदर्स यांना प्रदान करण्यात आला. याशिवाय जजेस स्पेशल पुरस्कार अरिहंत तलेरा यांच्या १९८४ रोल्स-रॉयस या गाडीने पटकावला. जुन्या गाड्यांच्या जतन व देखभालीत कारप्रेमींच्या मेहनतीची चमक या संपूर्ण प्रदर्शनात दिसून आली आणि या ऐतिहासिक गाड्यांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
जुन्या आणि दुर्मिळ मोटरसायकल्स जतन करणाऱ्या उत्कृष्ट दुचाकीधारकांना देखील या प्रदर्शनात सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत विविध गटांमधून विजेत्यांची घोषणा करण्यात आली. सर्वोत्कृष्ट देखभाल केलेली ‘बेस्ट मेंटेनड व्हिंटेज मोटरसायकल’ गटात सिद्धार्थ दराडे यांच्या 1938 बीएसए जी14 आणि हरीत त्रिवेदी यांच्या 1947 बीएसए एम20 या दुचाकींनी स्थान मिळवले. ‘बेस्ट मेंटेनड क्लासिक मोटरसायकल’ गटात विराज गोगावले यांच्या 1961 रॉयल एनफिल्ड बुलेट आणि अशोक नायडू यांच्या 1962 रॉयल एनफिल्ड बुलेट यांना सन्मानित करण्यात आले. इंडियन हेरिटेज मोटरसायकल गटात अभिजीत साबळे यांच्या 1974 येझदी बी टाइप आणि जित लखवानी यांच्या 1982 येझदी कोल्ट या दुचाकींनी पुरस्कार पटकावला.
बेस्ट रिस्टोर्ड व्हिंटेज मोटरसायकल गटात दीप्ती त्रिवेदी यांच्या 1931 एरियल स्लोपर आणि तन्वी त्रिवेदी यांच्या 1938 बीएमडब्ल्यू आर12 यांना गौरवण्यात आले. बेस्ट रिस्टोर्ड क्लासिक मोटरसायकल मोटरसायकल गटात अनिल भिंगारदे यांच्या 1959 बीएसए सुपर रॉकेट आणि योगेश आचार्य यांच्या 1956 रॉयल एनफिल्ड एन्साइन यांनी बाजी मारली. रीसेंट क्लासिक मोटरसायकल गटात लिओन डिसोझा यांच्या 1983 होंडा सीएम 250 आणि दीपक वेलणकर यांच्या 1968 मोबिलेट यांना विजेतेपद मिळाले.
इंडियन हेरिटेज मोटरसायकल गटात संकल्प बलकवडे यांच्या 1988 सुझुकी सुप्रा आणि नितीन गोंथे यांच्या 1987 यामाहा आरएक्स 100 या गाड्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वाधिक ओरिजिनल मोटरसायकल पुरस्कार योगेश खिरपाटे यांच्या 1973 विजय डीएल यांना मिळाला. या प्रदर्शनात ऐतिहासिक मोटरसायकलींनी उपस्थित मोटरसायकलप्रेमींना मोहून टाकले आणि जुन्या दुचाकींच्या जतन व संवर्धनाची महती अधोरेखित केली.
प्रदर्शनात स्कूटर प्रेमींनी आपल्या उत्कृष्ट जतन आणि पुनर्संचयित केलेल्या दुचाकींची झलक दाखवली. या स्पर्धेत विविध गटांतील स्कूटर्सना सन्मानित करण्यात आले. बेस्ट रिस्टोर्ड स्कूटर गटात योगेश आचार्य यांच्या 1970 एन्फिल्ड अॅरो आणि स्वप्निल कदम यांच्या 1983 बजाज प्रिया यांनी विजेतेपद मिळवले. बेस्ट मेंटेनड स्कूटर गटात विजय गोखले यांच्या 1984 बजाज वाकिंग आणि अक्षय शेलार यांच्या 1984 बजाज प्रिया यांना सन्मानित करण्यात आले.
याशिवाय, सर्वात अद्वितीय दुचाकी (Most Unique Two-Wheeler) म्हणून सोमनाथ साळुंखे यांच्या 1961 लॅम्ब्रेत्ता 48सीसी या दुचाकीला विशेष पुरस्कार देण्यात आला. या महोत्सवात दुर्मिळ आणि ऐतिहासिक स्कूटरच्या जतन आणि पुनर्संचयितीकरणातील उत्कृष्टतेचे दर्शन घडले, ज्यामुळे जुन्या दुचाकींच्या वारशाचा गौरव राखला गेला.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने