मुंबई, 15 एप्रिल (हिं.स.)।यंदा आयपीएलच्या काही सामन्यांत पंचांनी थेट मैदानावर बॅटची जाडी आणि रुंदी आणि किनार तपासण्यास सुरुवात केली आहे.आयपीएलमध्ये गेल्या वर्षापर्यंत हा नियम होता, परंतु बॅटची तपासणी ड्रेसिंग रूममध्ये होत होती, मात्र आता पंचांना भरमैदानात कोणाच्याही बॅटची तपासणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.त्यामुळे बॅटची उंची-जाडी-रुंदी नियमात असायलाच हवी, याबाबत आयसीसीचा नियम आता स्पष्ट आहे.
बीसीसीआयचे माजी आंतरराष्ट्रीय पंच ज्यांनी आयपीएलमध्ये १०० पेक्षा अधिक सामन्यांमध्ये पंचगिरी केलेली आहे, आता ते समालोचक आहेत. त्यांनीही या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केले. गेल्या मोसमापर्यंत आम्ही सामने सुरू होण्याअगोदर ड्रेसिंग रूममध्ये जाऊन खेळाडूंच्या बॅटची तपासणी करायचो. खेळाडूही आपल्या बॅट तपासणीसाठी द्यायचे, अशी माहिती एका माजी पंचाने दिली आहे.
खेळाडू जी बॅट तपासणीसाठी द्यायचे, त्यापेक्षा वेगळी बॅट घेऊन मैदानात येतात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे, तसेच बरेच फलंदाज वेगवेगळ्या वजनाच्या काही बॅट वापरत असतात, परंतु उंची-जाडी-रुंदी आणि किनार आयसीसीच्या नियमानुसारच असायला हवी, असे मत या माजी पंचाने व्यक्त केले आहे.
आयपीएलमध्ये रविवारी(दि.१३) झालेल्या दोन सामन्यांतून शिमरॉन हेटमायर (राजस्थान), फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल (बंगळूर), हार्दिक पंड्या (मुंबई इंडियन्स) यांच्या बॅटची मैदानावरील पंचांनी तपासणी केली. या सर्वांच्या बॅट्स नियमानुसार होत्या. बॅटच्या आकारमानाबाबतचा नियम कोणत्या खेळाडूने मोडला का? म्हणून भरमैदानात अशा प्रकारे बॅटची तपासणी केली जाऊ लागली आहे, याबाबत बीसीसीआयने काही स्पष्ट केले नाही
थोडी अधिक जाडी किंवा जाडसर किनार असलेल्या बॅटमुळे चुकलेले फटकेही सीमापार जाऊ शकतात, मैदाने मोठी असली तरी असे चुकलेले फटकेही प्रेक्षकांमध्ये जाऊ शकतात. यंदाच्या आयपीएलमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पडत आहे. रविवारपर्यंत झालेल्या केवळ २९ सामन्यांत मिळून ५२५ षटकारांची नोंद झालेली आहे. यात ३१ षटकार निकोलस पूरनने मारलेले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode