मुंबई , 2 एप्रिल (हिं.स.)।मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने आणि सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून जयदीप म्हणून घराघरात पोहचलेला अभिनेता मंदार जाधव लवकरच एकत्र 'कोण होतीस तू, काय झालीस तू!' या नवीन मालिकेत झळकणार आहेत.नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे.
कोण होतीस तू, काय झालीस तू! या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये सुकन्या मोने यशला म्हणजेच मंदार जाधवला आवाज देताना दिसत आहे. तर दुसरीकडे यश चिकूच्या घरी येण्याच्या स्वागताची तयारी करताना दिसतो आहे. त्याला घरातील लहान मुलंदेखील मदत करत आहे. या प्रोमोत साक्षी गांधी आणि नंदिनी वैद्य देखील दिसत आहेत.ही मालिका २८ एप्रिलपासून दररोज रात्री ८ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळेल. या मालिकेत गिरीजा प्रभू आणि वैभव मांगलेदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.या मालिकेत गिरीजा कावेरीच्या भूमिकेत दिसणार आहे. ती कोकणात राहणारी असून ती मालवणी भाषा बोलताना दिसणार आहे. तिच्या वडिलांच्या भूमिकेत वैभव मांगले पाहायला मिळणार आहे. या मालिकेतून पुन्हा एकदा मंदार जाधव आणि गिरीजा प्रभू एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यांना पुन्हा एकत्र मालिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
--------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode