रहस्यमय 'जारण' चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित
मुंबई, 2 एप्रिल (हिं.स.)। ए अँड एन सिनेमाज एलएलपी आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस प्रॉडक्शन प्रस्तुत ‘जारण’ चित्रपट येत्या ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे रहस्यमय मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे
मुंबई


मुंबई, 2 एप्रिल (हिं.स.)। ए अँड एन सिनेमाज एलएलपी आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस प्रॉडक्शन प्रस्तुत ‘जारण’ चित्रपट येत्या ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे रहस्यमय मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार, हे सुद्धा सध्या तरी एक रहस्यच आहे.

मोशन पोस्टरमध्ये एका विवाहितेच्या हातात बाहुली दिसत असून तिला टाचण्या टोचलेल्या आहेत. सोबतच पार्श्वभूमीला ऐकू येणाऱ्या रोमांचक संगीतामुळे हे मोशन पोस्टर थरारक अनुभवही देत आहे. यावरून हा चित्रपट जादूटोण्यावर आधारित तर नसेल? असा प्रश्न जर प्रेक्षकांना पडला, तर हे जाणून घेण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते म्हणतात, 'हा एक कौटुंबिक भयपट आहे. करणी, जारण यासारख्या गोष्टींमुळे एका कुटुंबाला सहन करायला लागणाऱ्या यातना हा चित्रपट मांडतो. मानवी भावनांचा आणि दुहेरी आयुष्याचा शोध घेणारा प्रवास आहे. प्रेक्षकांना एक वेगळा भयगूढ अनुभव देण्याचा प्रयत्न आम्ही ‘जारण’मधून केला आहे. आम्हाला खात्री आहे की, आमचा हा चित्रपट रसिकांना नक्की आवडेल.

निर्माते अमोल भगत म्हणतात, 'जारण’ या चित्रपटाच्च्या निर्मितीमागे एकाच वेळी भय, रहस्य आणि भावनाप्रधानता यांचा मिलाफ प्रेक्षकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. हृषीकेश यांच्या दिग्दर्शनातून हे कथानक अधिक परिणामकारक बनले आहे. आम्हाला विश्वास आहे की ‘जारण’ मराठी सिनेसृष्टीला आणि प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande