* हल्ल्यातील दोषींना आणि कट रचणाऱ्यांना अतिशय कठोर प्रत्युत्तर दिले जाईल!
नवी दिल्ली, २७ एप्रिल (हिं.स.) : दहशतवादाविरोधातल्या या युद्धात देशाची एकता, 140 कोटी भारतीयांची एकजूट ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. हीच एकता दहशतवादाविरुद्ध आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. देशासमोर उद्भवलेल्या या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपल्याला आपले संकल्प अधिक बळकट करायचे आहेत. एक राष्ट्र म्हणून आपल्याला प्रबळ इच्छाशक्ती दाखवून द्यावी लागेल. आज जग पाहत आहे या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश एका सुरात बोलत आहे, असेही ते म्हणाले.
‘मन की बात’ (121 वा भाग) कार्यक्रमातून पंतप्रधानांनी देशवासियांशी संवाद साधला.
मोदी पुढे म्हणाले की, आज मी तुमच्याशी 'मन की बात' मधून संवाद साधत आहे, मात्र माझे मन अतिशय व्यथित आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक दुःखी झाला आहे. शोकाकुल कुटुंबांप्रति प्रत्येक भारतीयाच्या मनात सहानुभूती आहे. भले ते कुठल्याही राज्यातील असो, कोणतीही भाषा बोलणारे असो, मात्र या हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांचे दुःख त्यांना जाणवत आहे. मला जाणीव आहे, दहशतवादी हल्ल्याची छायाचित्रं पाहून प्रत्येक भारतीयाचे रक्त खवळलं आहे. पहलगाममधील या हल्ल्यातून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांची उद्विग्नता दिसून येते, त्यांचा भेकडपणा दिसून येतो. काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शांतता नांदत होती, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चैतन्य होते, पायाभूत सुविधांच्या निर्मितीला गती मिळाली होती, लोकशाही मजबूत होत होती, पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली होती, लोकांचे उत्पन्न वाढत होते, युवकांसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या. मात्र देशाच्या शत्रूंना हे पसंत नव्हतं. दहशतवादी आणि त्यांचे आश्रयदाते यांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त व्हावं असं वाटत होतं आणि म्हणूनच एवढा मोठा कट रचण्यात आला.
भारतात आपल्या लोकांमध्ये हा जो आक्रोश आहे, तसाच आक्रोश आज संपूर्ण जगात आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून शोक संदेश येत आहेत. जागतिक नेत्यांनी मला दूरध्वनी केले आहेत, पत्रे लिहिली आहेत आणि संदेश पाठवले आहेत. या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा सर्वांनी तीव्र निषेध केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. दहशतवादाविरुद्धच्या आपल्या लढाईत संपूर्ण जग 140 कोटी भारतीयांसोबत खंबीरपणे उभे आहे. मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना विश्वास देतो की त्यांना न्याय मिळेल, नक्कीच न्याय मिळेल. या हल्ल्यातील दोषींना आणि कट रचणाऱ्यांना अतिशय कठोर प्रत्युत्तर दिले जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी