मुंबई, 3 एप्रिल (हिं.स.)।
मुंबई येथील हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी) समूह विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ हेमलता बागला यांनी आज राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्यासमोर राजभवन येथे विद्यापीठाचे विस्तृत सादरीकरण केले.
यावेळी त्यांनी राज्यपालांना विद्यापीठाच्या व्हिजन डॉक्युमेंट व रोडमॅपची माहिती दिली. यावेळी राज्यपालांनी विद्यापीठातर्फे होत असलेली राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, कौशल्य विकास अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांना कार्यानुभव तसेच आंतर्वासितेच्या संधी प्रदान करणे, परदेशी विद्यापीठांशी सहकार्य, अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढवणे, हॉस्टेल सुविधा निर्माण करणे, विद्यापीठ परिसर ड्रगमुक्त करणे व स्वच्छ भारत अभियान राबवणे तसेच क्रीडा विकासाला चालना देणे आदी विषयांचा आढावा घेतला व विद्यापीठाला यथायोग्य सूचना केल्या.
सन २०२० साली स्थापन झालेल्या एचएसएनसी समूह विद्यापीठामध्ये के सी महाविद्यालय, एच आर महाविद्यालय व बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेजचा समावेश आहे.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने