मुंबई, 3 एप्रिल (हिं.स.)।
कांदिवली पूर्व विधानसभेतील विविध रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामांची पाहणी कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज केली. महानगरपालिकेच्या पी/उत्तर विभागातील साईबाबा मंदिर, दिंडोशी पोलिस स्टेशन पासून ते डायाभाई पटेल मार्ग, राधा कुंज क्रॉस रोड, पोद्दार सर्कल, शिवाजी चौक मार्ग तर आर/दक्षिण विभागातील दादा सावे मार्ग, छीताभाई पटेल मार्ग, आकुर्ली क्रॉस रोड, अनिता नगर पर्यंतच्या रस्त्यांच्या कामांची पाहणी आमदार अतुल भातखळकर यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह केली.
सदर रस्त्यांच्या कामाची पाहणी करीत असताना वारंवार सूचना देऊनही रस्त्यांची कामं कालबद्द पद्धतीने का होत नाहीत असा सवाल आ. भातखळकर यांनी अधिकाऱ्यांना विचारला.
नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना रस्त्यांच्या अर्धवट कामांमुळे अनेक अडचणी येत आहेत, अनेक वेळी दुर्घटना घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांची कामं तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. रस्त्यांच्या कामांतील जे काही अडसर असतील ते दूर करुन ३१ मे २०२५ पर्यंत कामं पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन आ. भातखळकर यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना दिले.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने