हैदराबाद, 08 एप्रिल (हिं.स.) : तेलंगणाच्या हैदराबाद येथील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 5 दोषींची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. हैदराबाद येथे 21 फेब्रुवारी 2013 रोजी दिलसुखनगरमध्ये 2 प्राणघातक स्फोट झाले होते. यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला होता तर 131 जण जखमी झाले होते.
हैदराबादमधील दिलसुखनगरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी 13 डिसेंबर 2016 रोजी राष्ट्रीत तपास संस्था ( एनआयए) न्यायालयाने इंडियन मुजाहिदीनच्या या दहशतवादी संघटनेच्या सह-संस्थापक मोहम्मद अहमद सिद्दीबापा उर्फ यासिन भटकल, पाकिस्तानी नागरिक झिया-उर-रहमान उर्फ वकास, असदुल्ला अख्तर उर्फ हड्डी, तहसीन अख्तर उर्फ मोनू आणि एजाज शेख यांच्यासह 5 सदस्यांना दोषी ठरवले होते. तसेच या 5 दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. दोषींनी तेलंगणा उच्च न्यायालयात या शिक्षेला आव्हान दिले होते. न्यायमूर्ती के. लक्ष्मण आणि पी. श्री सुधा यांच्या खंडपीठाने दहशतवाद्यांनी दाखल केलेली फौजदारी पुनर्विचार अपील फेटाळून लावले. 'एनआयए' न्यायालयाने सुनावलेल्या फाशीचा निर्णय कायम ठेवला आहे.------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु