राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने TECH वारी : टेक लर्निंग वीक - हा आगळा-वेगळा उपक्रम ५ ते ९ मे दरम्यान मंत्रालय, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम केवळ एक प्रशिक्षण शिबिर नसून, ही राज्याच्या प्रशासनात डिजिटल परिवर्तन घडवून आणणारी एक सामूहिक चळवळ ठरणार आहे.
डिजिटल युगातील महाराष्ट्र शासनाची नवचैतन्य यात्रा
वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत खोल रुजलेली अभिव्यक्ती! ती आपल्याला सामूहिकता, समर्पण आणि अखंड प्रगती यांचे मूल्य शिकवते. शतकानुशतके वारीने आपल्या समाजात सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवले आहे. याच प्रेरणेवर आधारलेली ‘TECH-वारी’ ही नव्या युगाची, नव्या माध्यमांची आणि नवदृष्टीची डिजिटल यात्रा आहे. ही वारी प्रशासनातील प्रत्येक कर्मचाऱ्यास आधुनिक ज्ञानाने समृद्ध करून शासन व्यवस्थेत सकारात्मक परिवर्तन घडवून आणणार आहे. राज्यातील सर्वस्तरांवरील कर्मचाऱ्यांना डिजिटल कौशल्ये विकसित करून आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट टूल्स यांचे ज्ञान देणारा हा उपक्रम प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे.
नवतंत्रज्ञानाची ओळख आणि आत्मविश्वासाचा संचार
शासन अधिक उत्तरदायी, पारदर्शक आणि लोकाभिमुख असावे लागते आणि हे साध्य करण्यासाठी तंत्रज्ञान हा केवळ पर्याय नाही, तर काळाची गरज आहे. TECH-वारी या दिशेने एक निर्णायक पाऊल आहे. या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना खालील अत्याधुनिक विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे :
• स्मार्ट तंत्रज्ञान व डिजिटल साधनांचा प्रभावी वापर
• डेटा-संचालन प्रणाली आणि ई-गव्हर्नन्स सोल्यूशन्स
• सायबर सुरक्षितता
• कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ऑटोमेशन
• स्मार्ट निर्णयक्षमता आणि पारदर्शक व्यवहार
हे प्रशिक्षण अधिकारी – कर्मचारी यांच्या कार्यक्षमतेत आणि निर्णय क्षमतेत उल्लेखनीय वाढ घडवून आणेल.
ज्ञान, अध्यात्म आणि विविधतेचा संगम
TECH-वारी ही केवळ तंत्रज्ञानाशी संबंधित नसून, ती एक होलिस्टिक लर्निंग प्रोसेस ठरणार आहे. या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना केवळ डिजिटल कौशल्येच नव्हे, तर अध्यात्म, संगीत, आहारशास्त्र, पाककला इत्यादी विषय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून शिकण्याची संधी मिळणार आहे. जिथे मन, बुद्धी आणि तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम साधला जातो असा समग्र दृष्टिकोन रुजवण्याचा या अनोख्या उपक्रमाचा प्रयत्न आहे.
सामूहिकता आणि सहकार्याचे अधिष्ठान
TECH-वारी ही केवळ वैयक्तिक ज्ञानसंपादनाची प्रक्रिया नसून, ती संघभावनेवर आधारित यात्रा आहे. जसे पारंपरिक वारीत भाविक एकत्र येऊन एकाच ध्येयासाठी चालतात, तसेच या डिजिटल वारीतही सर्व कर्मचारी एकत्र शिकतील, अनुभव शेअर करतील आणि नवीन युगाशी सुसंगत होण्यासाठी एकत्र पावले टाकतील. ही वारी शासन यंत्रणेत सतत शिकणे (Lifelong Learning) आणि सहकार्याने काम करणे (Collaborative Governance) यांची एक नवीन संस्कृती घडवणार आहे.
TECH-वारी : परंपरा, तंत्रज्ञान आणि परिवर्तन यांचा सुंदर संगम
TECH-वारी हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला डिजिटल युगात आत्मविश्वासाने उभे राहण्याची ताकद देणार आहे. ही केवळ एक प्रशिक्षण यात्रा नाही; संघटनात्मक परिवर्तनाची, वैचारिक समृद्धीची आणि कार्यक्षम प्रशासनाच्या दिशेने चाललेली नवचैतन्यमय वाटचाल असणार आहे.
• वर्षा फडके-आंधळे, उपसंचालक (वृत्त)
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी