नवी दिल्ली, 10 मे (हिं.स.) : भारतात 23 कोटींहून अधिक मुस्लिम वास्तव्यास आहेत. इथल्या मुस्लिमांनी मोहम्मद अली जिनांचा द्विराष्ट्र सिंद्धांत नाकारला होता. आत भारतच आमचा देश असल्याचे प्रतिपादन ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवैसी यांनी केले.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 27 हिंदू पर्यटकांचे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी टार्गेट किलींग केल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर खासदार ओवैसी सातत्याने पाकिस्तानच्या विरोधात भूमिका घेऊन जोरदार टीका करीत असतात. भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर खासदार ओवैसी म्हणाले की,भारतामध्ये 23 कोटीहून अधिक मुस्लिम राहतात आणि आमच्या पूर्वजांनी मोहम्मद अली जिना यांचा द्विराष्ट्र सिद्धांत नाकारला होता. आम्ही भारताला आपलं राष्ट्र मानलं आहे आणि याठिकाणीच राहणार आहोत असे त्यांनी सांगितले. तसेच भारताला धर्माच्या आधारावर फोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. त्यामुळे पाकिस्तान हिंदू, मुस्लिम आणि इतर समुदायांमध्ये तेढ निर्माण करत आहे. जर पाकिस्तान द्विराष्ट्र सिद्धांत मानतो, तर मग ते अफगाणिस्तान व इराणच्या सीमांवर बॉम्बहल्ले का करत आहेत ? अफगाणी आणि इराणीही मुस्लिम आहेत. यावरून स्पष्ट होते की, पाकिस्तानची ‘डीप स्टेट’ बेकायदेशीर कृत्यं आणि दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी इस्लामचा केवळ मुखवटा म्हणून वापर करत आहे. गेल्या 75 वर्षांपासून पाकिस्तान भारताविरोधात हाच अजेंडा राबवत असल्याचा आरोप ओवैसी यांनी केला.
----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी