दिल्लीला बॉम्बस्फोटाची दिली धमकी युवकाच्या सतर्कतेमुळे पोलिस यंत्रणा अलर्टवरअमरावती, 10 मे (हिं.स.)। भारत-पाकिस्तान युद्धसदृश तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील नांदगावपेठ येथे घडलेल्या घटनेने खळबळ उडवली आहे. १० मे रोजी एक धक्कादायक प्रकार समोर आला, जेव्हा डव हेरिटेज गारमेंट कंपनीत काम करणाऱ्या ओडिशातील युवकाला पाकिस्तानहून (+९२ कोड) धमकीचा व्हॉट्सअॅप कॉल आला. कॉल करणाऱ्याने स्वत:ला पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी असल्याचे सांगून, दिल्लीतील चार ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिली.या कॉलमुळे प्रचंड घाबरलेल्या युवकाने तात्काळ नांदगावपेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. संबंधित युवकाचे नाव प्रशांत पंचानन ठाकुर (वय ३०, रा. बलांगी, ओडिशा) असे असून, तो नांदगावपेठ एमआयडीसीतील डव गारमेंट कंपनीत टेलर म्हणून कार्यरत आहे.
सकाळी ११ वाजताच्या सुमारास कामावर असताना प्रशांतला व्हॉट्सअॅपवर आलेल्या कॉलमध्ये समोरच्या व्यक्तीने मी पाकिस्तान आर्मीमधून बोलत आहे, आम्ही दिल्लीतील चार ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणार आहोत अशी धमकी दिली. घाबरून गेलेल्या प्रशांतने हा कॉल आपल्या मित्राकडे दिला. त्यांनी दोघांनी मिळून त्या व्यक्तीला उलट प्रत्युत्तर दिले आणि कॉल कट केला. मात्र त्यानंतर त्याच क्रमांकावरून सलग चार मिसकॉल आल्याने प्रशांत अधिकच घाबरला.त्याने तात्काळ ११२ वर संपर्क साधला. आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल होऊन त्याला पोलिस ठाण्यात घेऊन गेले. पोलिसांनी कॉलचे रेकॉर्डिंग ऐकून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. काही वेळातच डीसीपी सागर पाटील, एसीपी कैलाश पुंडकर, गुन्हे शाखा प्रमुख पीआय बाबाराव अवचार, सीपी स्पेशल स्कॉड प्रमुख पीआय आसाराम चोरमले यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी पोहोचले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अकोला येथील एटीएस, तसेच पोलिस आयुक्तालयातील एटीसी व आयबीच्या अधिकाऱ्यांनीही तपासात सहभाग घेतला. सायबर पोलिसांनी कॉलचा स्त्रोत शोधण्याचे तांत्रिक काम सुरू केले असून, सीपी रेड्डी आणि त्यांच्या टीमने संपूर्ण अहवाल तयार करून तो राज्य गृहमंत्रालय व केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला आहे.या प्रकारामुळे अमरावती शहर व परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करून त्यांना तात्काळ ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका-सिपी रेड्डी
पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी नागरिकांना +९२ पासून सुरू होणाऱ्या क्रमांकावरून आलेल्या कॉलला प्रतिसाद देऊ नये, तसेच सोशल मीडियावर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. अफवा पसरवणाऱ्यांविरोधात सायबर सेलमधील विशेष मॉनिटरिंग टीम तात्काळ कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी