अकोला, 20 मे (हिं.स.)। गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात अवकाळी पाऊस बरसत आहे. आजही रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने अकोला शहरातील अनेक भागात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. हवामान विभागाकडून जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार अकोल्यात काही दिवसांपासून अधून मधून रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत. आज पुन्हा एकदा अकोला शहरासह आसपासच्या ग्रामीण भागात धुवाधार पावसाने बॅटिंग केली आहे. या पावसामुळे परिसरातील नाले ओसंडून वाहू लागले.. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे उन्हाळी पिकांना फटका बसत आहेत. तर दुसरीकडे 40 अंशांवर गेलेला तापमानाचा पारा आता 38 अंशावर आल्याने उकड्यापासून अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे