चंद्रपूर, 20 मे (हिं.स.) : वनविकास महामंडळाच्या खडसंगी वनपरिक्षेत्रात वाघाने एका बछड्याला हल्ला करून ठार केल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. बछड्याचे शवविच्छेदन मंगळवारी करण्यात आले. चिमुर तालुक्यात असलेल्या प्रादशिक वनविकास महामंडळाच्या जंगलातून पर्यटन सफारी आटोपून येत असताना काही पर्यटकांना झुंजीत वाघाचा बछडा ठार झाल्याचे समजल्यावर त्यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली. घटनास्थळी वनविकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. महालगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक २१ मध्ये उरकुडपार तलावाजवळ सदर घटना घडली. वाघासोबत एका सात महिन्यांच्या मादी बछड्याची झुंज झाली. यामध्ये वाघाने बछड्याला ठिकठिकाणी केलेल्या गंभीर दुखापतीत बछडा ठार झाला.
--------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव